रत्नागिरी जिल्ह्यात अनंत अवैध धंदे असताना पोलीस नेमके करतात तरी काय? असा सवाल व्यक्त व्हायला वाव आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूधंदे, अवैध मटका धंदे, अवैध सावकारी चालू असताना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का बसले आहे? तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असताना अवैध दारू धंदे, अवैध मटका धंदा आणि अवैध सावकारी धंदे सुरू आहेत. हे पोलिसांना दिसत नाहीत की त्यांना फक्त तक्रारी दिल्यावरच कारवाई करण्याचा अधिकार आहे, हे समजण्यास वाव नाही. अनेक सिनेमात गुन्हा घडल्यावर आरोपी पसार होतो आणि पोलीस पोहचतात असे दाखविण्यात येते. मात्र इथे तर पोलिसांच्या जवळपास असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करायला पण पोलीस धजावत नाहीत. पोलिसांवर कुणाचा दबाव आहे की काय? आणि असा दबाव जर पोलिसांवर असेल तर पोलीस दबावात येऊन गप्प बसत आहेत की काय? असा संशय घ्यायला वाव आहे.
जिल्ह्यात अवैध दारू धंदे, अवैध मटका धंदे आणि अवैध सावकारीवर कारवाई करताना पोलीस दिसत नाहीत. मध्यंतरी रत्नागिरी शहरात अवैध सावकारी धंद्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला अचानक सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यानंतर अवैध सावकारी धंद्यांवर वचक बसलेला नाही. आजही सावकारी करून राजरोस लुटण्याचे धंदे जिल्ह्यात सुरू आहेत. बँका ग्राहकांना त्यांच्या वेळेला आणि कमी कागदपत्रात कर्ज देत नाहीत म्हणून सावकारी व्याजावर पैसे कर्ज लोकांना घ्यावे लागत आहे. मात्र सावकारीचा शासनमान्य दीड टक्का व्याज दर ठरवून लायसन दिली जातात. तेच लायसन्सधारी नियमात काम करत नाहीत. स्वतः करत असतील तर इतरांच्या नावाने १६ ते २० टक्के व्याजाने पैसे देण्यात येत आहेत. याबद्दल अनेकांनी पोलिसात फिर्याद दिल्या असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यावर किती कारवाई झाली हे जिल्हा पोलीस अधीक्षक कधी जनतेला सांगणार आहेत की नाही?
अवैध दारू धंदे तर अनेकांचे संसार उध्वस्त करत आहेत. असे जिल्हाभरात खूप धंदे आहेत. याकडे पोलिसांनी अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. हे दुर्लक्ष करण्यासाठी कोणाची कृपा झाली की कोणाचा दबाव आला, हे समजायला जनता सुज्ञ आहे. दारू धंदे परवानगी नसताना केले जातात आणि त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, हे म्हणजे मूठभर धंद्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हाकेच्या अंतरावर असे दारूधंदे आहेत, पण पोलिसांनी धृतराष्ट्र बनल्याचे नाटक करून त्यावर कारवाई करण्याचे टाळले आहे. यामागचे सत्य खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहित आहे? असे धंदे जिल्ह्यात नाहीत, हे जिल्हा पोलीस अधीक्षक जाहीर कधी करणार? की धंदे असून कानाडोळा करायची सवय लावून घेतली आहे? विनापरवाना दारूधंदे असलेले पोलिसांना माहिती नसतील काय? असा सवाल व्यक्त केल्यास वावगे ठरू नये.
विनापरवानगी मटका धंदे नाकानाक्यात सुरू असताना पोलिसांना ते दिसत नाहीत. कारण पुन्हा पोलिस तक्रार येईल तेव्हा कारवाई करू या मूडमध्ये असतील किंवा पुन्हा धृतराष्ट्र बनल्याचे नाटक करत असतील. मटका धंद्यांवर मिसरूड न फुटलेली मुलं दिसतात, तेव्हा त्यांच्या पालकांना जे दुःख होते, त्याची कल्पना पोलिसांना येणार नाही. मटका धंद्यात आकंठ बुडणाऱ्या तरुणाईवर कारवाई करणे म्हणजे खूप कुमक लागेल. पण असे धंदे समूळ नष्ट करायला पोलिसांना शक्य नाही काय? शक्य नसेल तर तसे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे. किमान जनतेला पोलिसांच्या मर्यादा कळतील. अवैध दारूधंदे, अवैध सावकारी, अवैध मटका धंदा यावर वचक ठेवणे पोलिसांना जमलेले नाही. भविष्यात जमेल काय? याचे उत्तर काळ देईल. मात्र पोलिसांना काहीही अशक्य नाही, फक्त मानसिकता हवी समाज सुधारण्याची, मानसिकता हवी समाज बदलाची, मानसिकता हवी आपल्या अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर करण्याची! अर्थात सगळेच पोलीस असे अधिकार न वापरणारे नसतात, पण जे खाकीचा अधिकार वापरत नाहीत आणि आपल्या अधिकाराच्या तलवारी म्यान करून ठेवतात, त्यांचा धाक अवैध धंदे चालविणाऱ्या समाजविघातक लोकांना कसा बसेल? अर्थात पोलिसांनी धृतराष्ट्र न बनता महाभारतातील संजय बनायला हवे!





