रत्नागिरी : प्रतिनिधी
माकड, वानर यांचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव, शेतीचे मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर वनखात्यामार्फत रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यात दि. २६ ते ३० मेपर्यत वानर, माकड यांची संयुक्त प्रगणना मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत गावांतील युवक, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. प्रगणनेच्या कामी कृषी विभागालाही सहभागी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या मोहिमेसाठी वनखात्याच्यावतीने युवकांना एक दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वनविभाग रत्नागिरी,(चिपळूण) यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील उपद्रवी वानर व माकड यांची प्रगणना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. या मोजणीसाठी स्वंयसेवी संस्था, विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ यांची मदत आवश्यक आहे. याकरिता लोकांना मोजणीपूर्वी एक दिवसाचे ट्रेनिंग देण्यात येईल. तसेच मोजणी कामात सहभागी लोकांना वन विभागामार्फत सर्टिफिकेट देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक प्राप्त होताच कळविण्यात येईल. कोकणात विशेषत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत माकड, वानर यांनी शेतीचे मोठे नुकसान केले आहे. नारळी, फोपळी, हंगामी भाजी पाला यांचे मोठया प्रमाणात माकड ,वानर कडून नुकसान झाले आहे लांजा, रत्नागिरी ,राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली आदी तालुक्यातील अनेक गावांत वानर, माकड यांचे कळप पाहवयास मिळतात. काही वर्षांत माकड संख्यावाढ झाली आहे. कोकणातील शेतकरी यांनी अनेक वर्षे माकड ,वानर यांच्यापासून नुकसान भरपाई आणि बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी यांच्या या मागणीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत.