रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात ९४७ नवीन ५ जी पॉस मशिन मिळाल्या आहेत. यामुळे आता ५ जी पॉस मशिन मिळाल्यामुळे रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकांकडून व्यक्त केली जाणारी नाराजी दूर होणार आहे. २०१७ मध्ये या सर्व रेशन दुकानांना पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात आली होती. या मशिनच्या देखरेख दुरुस्तीचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. पाच वर्ष पूर्ण होऊनही सर्व रेशन दुकानदार शासनाकडून मिळालेल्या याच मशिनचा वापर करत आहेत. शिधा वाटप करताना या जुन्या मशिनमुळे खूप अडचणी येत होत्या.

जिल्हा पुरवठा विभागाकडून आता जिल्ह्यातील ९४३ रेशन दुकानांसाठी तब्बल ९४७ पॉस मशिन प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आनंद शिधा वितरण करतानाही या मशिनमुळे खूप अडचणी येत होत्या. बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने येणारी ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने नवीन पॉस मशिनसाठी राज्य अन्न आणि पुरवठा विभागाकडे मागणी केली गेली आहे. या मागणीमध्ये अद्ययावत ४जी आणि ५जी पॉस मशिन मिळाव्यात, असा उल्लेख करण्यात आला होता. आता शासनाने या मागणीनुसार जिल्ह्यात नवीन ५ जी पॉस मशिन प्राप्त झाल्या आहेत.




