पंतप्रधान मोदीजी आणि सामंत बंधू यांच्या जीवावर दोन वेळा विजयी झालेल्या विनायक राऊत यांचा फुगा फुटण्याची वेळ आली आहे. कारण आज वारे फिरले आहेत. मोदीजींचा करिष्मा आणि सामंत बंधूंची साथ आज विनायक राऊत यांच्या मागे नाही. ही सगळी ताकद नारायण राणे यांच्या सोबत आहे. त्यामुळे राऊत यांचा पराभव निश्चित आहे. फक्त किती मतांनी ते पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील दहा वर्षे खासदार असलेल्या विनायक राऊत यांची निवडणूक गणिते वेगळी होती. कारण मागील निवडणूकीत निलेश राणे हे स्वाभिमानकडून उभे असल्याने एकीकडे भारतीय जनता पार्टीने विनायक राऊत यांचा निष्ठापूर्वक प्रचार केला होता. अर्थात ही निष्ठा विनायक राऊत यांच्याशी नसून नरेंद्र मोदी यांच्यासाठी होती. दुसरीकडे शिवसेनेतर्फे सामंत बंधूंनी विनायक राऊत यांची कमान सामदामदंडभेद वापरून सांभाळली होती. आज मोदीजी आणि सामंत बंधू एकत्र आहेत आणि विनायक राऊत हे एकाकी. त्यामुळे इथला पराभव राऊत यांचा चिंतन करण्यास लावणारा असेल. विनायक राऊत यांनी स्वपक्षात छूपी नाराजी ओढवून घेतली आहे. त्याचा परिणाम ४ जूनला होणाऱ्या निकालात दिसणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील ना. दीपक केसरकर आणि राजन तेली यांचे वर्चस्व हे नारायण राणे यांच्या पथ्यावर आहे. इथे विनायक राऊत आपल्या मुलीला केसरकर यांच्या विरोधात उभे करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इथे या उमेदवारीला नाराजीचा सूर आहे. त्यामुळे किमान २५ हजाराचे मताधिक्य राणे यांना इथे मिळणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघ हा आ. नितेश राणे आणि प्रमोद जठार यांचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ तितकाच ताकदीने नारायण राणे यांच्या पाठीशी राहिला आहे. इथे किमान ५० हजाराचे मताधिक्य हे नारायण राणे यांना असेल. त्यापाठोपाठ उबाठा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणविला जाणार कुडाळ विधानसभा मतदारसंघ आ. वैभव नाईक आणि विनायक राऊत यांच्या शीतयुद्धात राऊत यांना फटका देणारा ठरणार आहे. इथे निलेश राणे यांनी आपली ताकद पणाला लावली असून आगामी विधानसभा निवडणुकीत राणे यांना जिंकण्याची ही निवडणूक रंगीत तालीम ठरली आहे. इथे वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्या मतांच्या गणितात फारसा फरक राहणार नाही. किंबहुना निलेश राणे हे इथे किमान १० हजाराचे मताधिक्य नारायण राणे यांना देतील, यात शंका नाही. तीन विधानसभा मिळून सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ८५ हजाराचे मताधिक्य नारायण राणे यांना असेल.
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आ. शेखर निकम, सदानंद चव्हाण, रामदास राणे आणि भाजपची टीम यांच्या जोरावर किमान १५ हजाराचे मताधिक्य राणे यांना मिळेल. राजापूर विधानसभा मतदारसंघात आ. राजन साळवी यांचा प्रभाव असला तरी त्याचा फारसा परिणाम राऊत यांना होणार नाही. इथे अविनाश लाड यांना उमेदवारी देण्यासाठी विनायक राऊत प्रयत्नशील असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आ. राजन साळवी यांचे कट्टर समर्थक आतून फार नाराज आहेत. याचा अर्थ त्यांनी भाजपला मतदान केले असा नाही. तर त्यांची नाराजी ही मतांचा टक्का कमी झाल्याने दिसली आहे, अशी कुजबूज आहे. त्यात नाणार भागात रिफायनरी विरोध आणि बारसू भागात रिफायनरी पाठिंबा ही उद्धव ठाकरे आणि त्यांचे खासदार विनायक राऊत यांची दुटप्पी भूमिका इथे लोकांच्या लक्षात आल्याने मतदान विरोधात झाल्याची चर्चा आहे. आ. राजन साळवी यांचा रिफायनरीला पाठिंबा असल्याने आणि विनायक राऊत यांचा तात्पुरता विरोध असल्याने इथे मतदारांनी राऊत यांना विरोध केल्याचे निष्पन्न होणार आहे. आमच्या सूत्रांनी घेतलेल्या आढाव्यानुसार, इथे विनायक राऊत यांना १० हजाराच्यावर मताधिक्य मिळणार नाही. हा मतदारसंघ सोडला तर विनायक राऊत यांच्या पदरात मतांची बेगमी फार झालेली नाही.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपची, मोदींची फिक्स व्होटबँक असलेला मतदारसंघ आहे. इथे ७० हजार मते ही कमळ निशाणीची आहेत. त्याला ना. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी घेतलेले कष्ट राणे यांच्या मताधिक्यात भर टाकणारे आहेत. इथे सव्वा लाख मते राणे यांना मिळायला वाव आहे. सुमारे ५५ हजार मते ही सामंत यांनी केलेल्या कामाची पोचपावती देणारी ठरतील. त्यापेक्षा कमी मतदान झाले असेल तर सामंत यांच्यावर शंका घेण्यास वाव आहे. मात्र आज जे सामंत यांच्याबद्दल उबाठा गटवाले शंका घेत आहेत, त्यावरून सामंत यांची किंमत ते शिंदे गटात गेल्यावर किती आहे, हे दिसून आले. आ. राजन साळवी आणि आ. वैभव नाईक दोघे किरण सामंत यांच्याबद्दल आपुलकी असणारी विधाने करत होते. त्यावर किरण सामंत यांनी जोरदार पलटवार केला. याचा अर्थ किरण सामंत यांनी महायुतीचे काम इमानेइतबारे केले आहे. ते नॉटरिचेबल होते, असा गैरसमज माध्यमांनी पसरविला असला तरी ते राजापूर विधानसभा मतदारसंघात आगामी आमदारकीची रंगीत तालीम करायला गेले होते, हे लपून राहिलेले नाही. राजापूर विधानसभा मतदारसंघ किरण सामंत हे जिंकू शकतात, याची गणिते या निवडणूकीत राजापूर, लांजा, साखरपा भागातून मिळणाऱ्या मताधिक्यावर समजणार आहेत. इथे आ. राजन साळवी यांना धक्का देण्यासाठी किरण सामंत यांनी फिल्डिंग लावली होती. त्यात ते कितपत यशस्वी झाले ते ४ जूनला कळणार आहे. किरण सामंत यांची स्वतंत्र यंत्रणा आहे, तशी ती उदय सामंत यांच्याकडे नाही. पण किरण सामंत एखाद्याला जिंकून आणू शकतात तसे त्याला पाडू शकतात. मात्र यावेळी ते कोणाला जिंकून आणतात, यावर शंका घेण्याचे कारण नाही. कारण आमच्या सूत्रांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा जिंकण्यासाठी जोरदार यंत्रणा राबविली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांनी राणे यांचे काम केले. त्यापेक्षा जास्त काम राजापूर विधानसभेत किरण सामंत यांनी केले आहे. कारण इथे महायुती म्हणून मतदार खूप कमी आहे, ते गणित समपातळीवर आणण्याचे कार्य किरण सामंत यांनी केले आहे. शिवाय इथे राणे यांची स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली होती. राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जे आता मताधिक्य मिळणार आहे, त्यावर इथली महायुतीची उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे इथे फसवणूक होण्याची शक्यता अजिबात नाही. विनायक राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४० हजार मते मिळतील. त्यामुळे इथे ८५ हजाराचे मताधिक्य मिळेल. सगळे अंदाज पाहता, सामंत बंधू, भाजपची टीम, शेखर निकम यांच्या जोरावर १ लाखाचे मताधिक्य हे रत्नागिरी जिल्ह्यातून मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे साधारण १ लाख ८५ हजाराचे मताधिक्य महायुतीच्या नारायण राणे यांना निर्विवाद मिळू शकते. या सर्वात मनसे, राष्ट्रवादी, रिपाइं यांचा खारीचा वाटा निश्चित आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, सहप्रभारी बाळ माने, निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्या प्रभावी नियोजनाचा परिपाक म्हणजे नारायण राणे यांचा विजय असेल, यात शंका नाही!