रत्नागिरी : प्रतिनिधी
यावर्षी कोकणातील आंबा उत्पादनात तब्बल ८० टक्के घट झाली असून, या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलत आहे. बागायतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरच मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी दिली.
“शेतकऱ्यांची मुले उद्योजक व्हावीत यासाठी बँकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर बँकांनी विनाकारण अडवणूक केली, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास मागेपुढे पाहणार नाही.” – ना. डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंबा बागायतदारांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संकटाची दाहकता: ८०% उत्पादन घटले : कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने सादर केलेल्या संयुक्त अहवालानुसार, यंदा निसर्गाचा मोठा फटका बसला आहे.प्रदीर्घ दव, कडाक्याची थंडी आणि ‘थ्रिप्स’ (फुलकिडे) व तुडतुड्यांचा वाढलेला प्रादुर्भावामुळे मोहोर काळा पडणे आणि नर मोहोरांचे प्रमाण वाढल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तालुकानिहाय विस्तृत अहवाल तातडीने शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
पालकमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि घोषणा
- मंत्रालयात बैठक: अन्न व औषध प्रशासन मंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावले जातील.
- हवामान केंद्रांचे जाळे: रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील असा पहिला जिल्हा ठरेल, जिथे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ बसवले जाईल.
- बँकांना सज्जड इशारा: बँकांनी शेतकऱ्यांना ‘सिबिल स्कोअर’चे कारण सांगून अडवणूक करू नये. ज्या बँका CMEGP चे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, त्यांच्याकडून शासकीय खाती काढून घेतली जातील, असा इशारा डॉ. सामंत यांनी दिला.
- रत्नागिरी हापूसचा ब्रँड जपणार: “रत्नागिरी हापूस ही आपली ओळख आणि चव आहे, तिचे महत्त्व कमी होऊ देणार नाही,” असे सांगत पालकमंत्र्यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले.
- विद्यापीठाला संशोधनाचे निर्देश :केवळ आंबाच नव्हे, तर काजू, कोकम आणि फणस या फळांवरही कोकण कृषी विद्यापीठाने सखोल संशोधन करावे. तसेच, बागायतदारांच्या सुविधेसाठी फवारणीचे वेळापत्रक एक महिना आधीच उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.





