रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात कर्जवसुलीसाठी गेलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेचे कर्मचारी लक्ष्मण गणू म्हात्रे यांना ही मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तिघाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसी येथील रहिवासी हिदायद इस्माईल वस्ता यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण म्हात्रे हे आपल्या पथकासह वस्ता यांच्या घरी गेले होते. यावेळी कर्ज वसुलीच्या कारणावरून हिदायद वस्ता यांनी बँक पथकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद सुरू असतानाच अल्ताफ संगमेश्वरी आणि हनिफ हिदायद वस्ता हे त्या ठिकाणी आले. यावेळी संशयित आरोपींनी म्हात्रे यांना अश्लील शिवीगाळ करत, दमदाटी केली आणि मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याने तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी अल्ताफ संगमेश्वरी, हिदायद इस्माईल वस्ता आणि हनिफ हिदायद वस्ता या तिघांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. संशयितांमध्ये बँकेच्या एका संचालकाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.




