रत्नागिरी : प्रतिनिधी
ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तिन्ही गायकींचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, त्यांच्या शिष्यांनी ‘गुरुऋण’ या विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘ओंकार आदिनाद फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘मुग्धनाद रत्नागिरी’ व ‘रघुकुल स्वरविहार सावंतवाडी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गोदूताई जांभेकर विद्यालय (एस.टी. स्टँड समोर) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पंडित विकास कशाळकर यांनी आजवर अनेक परिचित आणि अपरिचित रागांमध्ये सुमारे २०० हून अधिक बंदिशींची रचना केली आहे. एक उत्तम गुरु, संगीततज्ज्ञ, रिसर्च गाईड आणि ‘ऊस डोंगा परी’ व ‘निर्धार’ यांसारख्या संगीत नाटकांचे लेखक व संगीतकार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या विविधांगी सांगीतिक वाटचालीचा गौरव करण्यासाठी, भारत आणि परदेशातील त्यांचे सर्व शिष्य आपापल्या शहरात त्यांच्याच रचनांचे सादरीकरण करून गुरुंविषयीची श्रद्धा व्यक्त करत आहेत.
रत्नागिरीत होणाऱ्या या मैफलीत सौ. मुग्धा भट-सामंत, श्री. प्रसाद भाटवडेकर, सौ. नूतन परब-तेजम आणि सौ. मनाली दाणी-बर्वे हे कलाकार पं. कशाळकर यांनी बांधलेल्या बंदिशींचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना श्री. हेरंब जोगळेकर (तबला) आणि कु. श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम) साथसंगत करतील. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन डॉ. अंजली दाणी करणार आहेत.
हा कार्यक्रम सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार असून, सर्व रसिक श्रोत्यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




