मुंबई : प्रतिनिधी
मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत राजेंद्र ढेरिंगे या कर्मचाऱ्याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लाचखोरीची ही पद्धत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड करणारे तक्रारदार निर्मल शर्मा यांनी लाचखोरीच्या धक्कादायक कार्यपद्धतीचा खुलासा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, या रॅकेटमध्ये मंत्री नरहरी झिरवळ यांचे खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांचाही सहभाग आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रलंबित फाईल्सवर लाल आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्या (रेषा) मारल्या जात असत. या रेषा म्हणजे लाचेची रक्कम ठरवणारे ‘सिक्रेट कोडवर्ड’ होते. फाईलवर मारलेल्या विशेष खुणांवरून कोणत्या कामासाठी किती पैसे द्यायचे हे निश्चित केले जात असे. उदाहरणार्थ, एक रेषा म्हणजे ५० हजार रुपये तर दोन रेषा म्हणजे १ लाख रुपये अशी त्यांची सांकेतिक भाषा होती.
निर्मल शर्मा यांनी स्वतःच्या अनुभवाबाबत सांगितले की, त्यांच्या मेडिकल दुकानात काही किरकोळ त्रुटी आढळल्या होत्या, ज्या त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केल्या होत्या. मात्र, या कारणावरून त्यांच्या दुकानाचा परवाना चक्क एका महिन्यासाठी निलंबित करण्याचा अन्यायकारक आदेश काढण्यात आला. याविरोधात दाद मागण्यासाठी शर्मा मंत्रालयात पोहोचले. त्यांनी आपले अपील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर १३ तारखेला सुनावणीसाठी ते पुन्हा अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात गेले. तिथे डॉ. रामदास गाडे आणि राजेंद्र ढेरिंगे यांच्यासमोर त्यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली, जिथे फाईल न पाहताच थेट पैशांची मागणी करण्यात आली.
शर्मा यांनी असाही आरोप केला आहे की, मेडिकल दुकानांच्या परवाना निलंबनासारख्या महत्त्वाच्या सुनावण्या स्वतः मंत्री न घेता त्यांचे अधिकारीच परस्पर हाताळत होते. तसेच, मंत्रालयात कितीही ओळख असली तरी अन्न व औषध प्रशासन विभागात काम करून घेण्यासाठी पैसे मोजावेच लागतात, असा खळबळजनक दावाही शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयातील प्रशासकीय कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे मंत्रालयातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एसीबीच्या पुढील तपासामुळे आणखी कोणत्या मोठ्या नावांचा यात समावेश आहे, हे समोर येण्याची शक्यता आहे.





