सिंधुदुर्ग/रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर आता खाणकामाचे मोठे सावट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत एकूण २६ खाण ब्लॉक्स प्रस्तावित असून, यामध्ये लोह खनिज, बॉक्साईट आणि चक्क सोन्यासारख्या मौल्यवान धातूंचा समावेश असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांत सर्वाधिक खाण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे तब्बल २००० हेक्टर क्षेत्रावर लोह खनिजाचा महाप्रकल्प प्रस्तावित आहे. त्यापाठोपाठ सावंतवाडीतील सतरडा (१२०० हेक्टर) आणि आजगाव (८४० हेक्टर) या भागातही लोह खनिजाच्या मोठ्या खाणींना मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे, सावंतवाडी तालुक्यातील बागवाडी आणि घनपेवाडी या दोन गावांच्या परिसरात सुमारे ८०५ हेक्टर क्षेत्रात सोने (Gold), निकेल आणि क्रोमियम यांसारख्या अत्यंत दुर्मिळ खनिजांचे साठे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय कणकवलीच्या बिडवाडीत ग्रॅफाइट, तर मालवण आणि देवगड तालुक्यात बॉक्साईटच्या खाणी प्रस्तावित आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता, राजापूर तालुका हा खाणकामाचे केंद्र बनताना दिसत आहे. येथील साउथ पाडवे (५०० हेक्टर), पलीये (२२० हेक्टर) आणि बहुचर्चित नाणार (१४४ हेक्टर) परिसरात बॉक्साईट उत्खननाचे नियोजन आहे. दापोली तालुक्यातील चिखलगाव येथेही बॉक्साईट साठ्यांची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे केंद्र सरकारने अरवली पर्वतरांगांमधील पर्यावरण वाचवण्यासाठी तिथे नवीन खाणकामावर पूर्णपणे बंदी घातली असताना, दुसरीकडे पश्चिम घाटाच्या कुशीत असलेल्या या दोन जिल्ह्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खननाची तयारी सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रस्तावित २६ प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांना ‘मायनिंग लीज’ (ML) मिळाले असून अनेक प्रकल्प ‘कंपोझिट लायसन्स’ (CL) च्या टप्प्यावर आहेत. या प्रकल्पामुळे कोकणात मोठा रोजगार निर्माण होणार की येथील संवेदनशील पर्यावरणाचा ऱ्हास होणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. विशेषतः आंबा, काजू आणि पर्यटन यांवर आधारित कोकणच्या अर्थव्यवस्थेवर या खाणकामाचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाणकामाचा विस्तार मोठा असून सर्वाधिक क्षेत्र लोह खनिजासाठी आरक्षित आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे २००० हेक्टर, तर सावंतवाडीतील सतरडा येथे १२०० हेक्टरवर लोह खनिजाचे उत्खनन प्रस्तावित आहे. सावंतवाडी तालुक्यातील बागवाडी (२८५ हेक्टर) आणि घनपेवाडी (५२० हेक्टर) या भागात केवळ लोह खनिजच नाही, तर सोने (Gold), प्लॅटिनम ग्रुप (PGE), निकेल आणि क्रोमियम सारख्या अत्यंत मौल्यवान धातूंचे साठे असल्याचे माहितीवरून स्पष्ट होत आहे. कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथे १५७ हेक्टरवर ग्रॅफाइट खाणीचे नियोजन आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने बॉक्साईट उत्खननावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राजापूर तालुक्यातील साउथ पाडवे (५०० हेक्टर), नाणार (१४४ हेक्टर) आणि पलीये (२२० हेक्टर) या भागात बॉक्साईटचे मोठे ब्लॉक्स आहेत. दापोली तालुक्यातील चिखलगाव (पश्चिम) येथे २१ हेक्टरवर बॉक्साईट उत्खननाचे नियोजन आहे.





