कोल्हापूर : प्रतिनिधी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील जनतेच्या ३५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच (खंडपीठ) चे औपचारिक उद्घाटन होणार आहे. सीपीआर समोरील, पूर्वी कौटुंबिक न्यायालय असलेल्या इमारतीत हे खंडपीठ कार्यरत होणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांसाठी न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि खर्चिकदृष्ट्या परवडणारी ठरणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ पासून हे खंडपीठ प्रत्यक्ष कामकाज सुरू करणार असून, यासंदर्भातील राजपत्रही प्रकाशित झाले आहे.
या खंडपीठासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच मुख्यमंत्री कार्यकाळात यासाठी विशेष लक्ष दिले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, हे खंडपीठ नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा या विद्यमान खंडपीठांमध्ये आता चौथ्या पायरीसारखे जोडले गेले आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई आणि महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा. आलोक आराधे यांचे विशेष आभार मानले आहेत.न्यायालयीन प्रक्रिया स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च यामध्ये लक्षणीय बचत होणार असून, न्यायासाठी मोठ्या शहरांमध्ये धावपळ करावी लागणार नाही. या निर्णयामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील न्यायप्रणालीला नवसंजीवनी मिळणार असल्याचेही प्रशासनातून व्यक्त होत आहे.