रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरात पुन्हा अंमली पदार्थ, ब्राऊन शुगरची विक्री डोके वर काढू लागली आहे. ब्राउन हॅरॉईन सदृश्य अमली पदार्थ सोबत बाळगणाऱ्या मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोन्ही रा. राजीवडा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अमली पदार्थाच्या १७५ पुड्यामध्ये ११ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हिरोईन हा अमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण रु ९०५०० रुपयाचा मुद्देमाल रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषणने पकडला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे रत्नागिरी शहरात दि. गुरुवार दिनांक २४ जुलै रोजी गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे राजीवडा ते कर्ला जाणाऱ्या रोडवर बुडये मोहल्ला, राजिवडा, रत्नागिरी या ठिकाणी दोन संशयित हातात पिशवी घेऊन विशिष्ट हालचाली करत असताना दिसून आले म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने त्यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांच्या ताब्यातील पिशवी पंचांच्या समक्ष तपासून खात्री केली असता त्यामध्ये ब्राउन हॅरॉईन ह्या अमली पदार्थाच्या एकूण १७५ पुड्या व इतर साहित्य विक्री करिता आणलेले मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही इसमांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३१/२०२५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.




