रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकणातील लांब पल्ल्याच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एसटी प्रवास म्हणजे उपासमारीचा प्रवास’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथून रत्नागिरी वा मुंबईकडे निघणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान जेवणाची कोणतीही सोय मिळत नाही. राजापूर, पाली, संगमेश्वर, चिपळूण आणि चिपळूण शिवाजीनगर येथील एसटी उपहागृहे बंद असून या मार्गावरील प्रवाशांना अन्न-पाण्यावाचून प्रवास करावा लागत आहे.प्रवासादरम्यान जेवणाची वेळ सरते. वृद्ध, महिला व लहान मुलांना अन्नपाणी न मिळाल्याने शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अनास्थेमुळे प्रवाशांची हेळसांड सुरू असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
एसटी महामंडळाने उपहागृहे चालवण्यासाठी काढलेल्या निविदांचे दर स्थानिक व्यावसायिकांना परवडत नसल्याने या ठिकाणची हॉटेल्स बंद आहेत. परिणामी प्रवाशांसाठी सोयी-सुविधा नाहीत आणि महामंडळाला उत्पन्नही नाही. ही स्थिती वर्षानुवर्षे सुरू असून याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. त्यातच काही चालक आणि वाहक स्वतःच्या सोयीसाठी मनमानी थांबे घेत प्रवासात थांबतात आणि जेवण करून घेतात. मात्र प्रवाशांना कुठेही थांबवले जात नाही. ही प्रवृत्ती प्रवाशांच्या सहनशीलतेचा खेळ करत असून त्यांना उपाशीपोटी प्रवास करावा लागत आहे.
दरवेळी परिवहन खात्याला नवीन मंत्री मिळाल्यावर ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ देण्याचे गाजावाजा करून आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कोठेही अशी सुविधा नाही. त्यामुळे अशा घोषणा केवळ फसव्या आणि कागदावरच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे.बस स्थानकांवरील बहुतांश बसेस मोडकळीस आलेल्या, जुन्या आहेत. एखाद दुसरी नवी बस आल्यानंतर सोशल मीडियावर राजकीय प्रचार सुरू केला जातो. मात्र इतकी वर्षे बसेस का दिल्या गेल्या नाहीत, याचे उत्तर देणारा कोणीही नसतो.
प्रवाशांना अन्नपाण्याविना प्रवास करावा लागणं ही लाजिरवाणी बाब आहे. एसटीच्या उपहागृहांवरील अपयश, मनमानी धोरणं, चुकीच्या निविदा प्रक्रिया आणि प्रवाशांना वाऱ्यावर सोडण्याच्या प्रवृत्तीवर एसटी महामंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे. अन्यथा ‘लाल परी’चे दररोजचे प्रवासी आता पर्यायी मार्गाकडे वळू लागले आहेत, हे सत्य आहे.