रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी एसटी विभागीय कार्यालयाच्या स्टाफ वाहनावर अपघात प्रकरणात दोषी ठरलेल्या चालकाची नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नियमानुसार स्टाफ वाहनावर विनाअपघात आणि स्वच्छ प्रतिमेच्या चालकाची नियुक्ती करणे अपेक्षित असताना, या नियमांना बगल देऊन अपघातग्रस्त चालकाला ही जबाबदारी दिल्याने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. अशी नियुक्ती देताना नियम पायदळी का तुडवले जात आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.
एसटी महामंडळाच्या नियमांनुसार, स्टाफ वाहनासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी विना अपघात चालकांची नियुक्ती केली जाते, ज्यांचा आजवर कोणताही अपघात झालेला नाही किंवा ज्यांच्यावर अपघातासंदर्भात कोणताही दोषारोप नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि प्रशासनावरचा विश्वास वाढतो. मात्र, रत्नागिरी विभागात या नियमांना हरताळ फासला गेल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालकाचा पूर्वी एका अपघात प्रकरणात दोष सिद्ध झाला होता. पूर्वी अपघातात एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या चालकाला थेट विभागीय कार्यालयाच्या स्टाफ वाहनावर नियुक्ती दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या निर्णयामागे नेमके कोणते कारण आहे, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. या वादग्रस्त नियुक्तीमुळे एसटीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




