राजापूर : प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने एका संपूर्ण इमारतीला गिळंकृत केले. या आगीने सात दुकानांची राख झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही इमारत राजेश दत्ताराम पावसकर (धाऊलवल्ली) यांची मालकीची असून, यामध्ये कोणतीही रहिवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
या इमारतीतील गाळा १ : दिगंबर गिजम – उपहारगृह (संपूर्ण फर्निचर, किचन यंत्रणा जळाली), गाळा २ : भीम खंडी – चायनीज फास्ट फूड सेंटर, गाळा ३: प्रदीप मयेकर – टेलरिंग शॉप (मशिन्स, तयार कपडे भस्म), गाळा ४: केदार ठाकूर – कापड व प्लास्टिक वस्तू विक्री, गाळा ५: प्रसाद पाखरे – फोटो स्टुडिओ (कॅमेरे, प्रिंटिंग उपकरणे, संगणक), गाळा ६: निकिता गोसावी – ब्युटी पार्लर, गाळा ७: नारायण गोसावी – कटलरी साहित्यांचे गोडाऊन यांचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच सागरी पोलीस स्टेशन नाटेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर, नाईट चेकिंग अमलदार व तत्पर पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. ग्रामस्थांनी रात्रीचा विचार न करता स्वतःच्या वाहनांतून पाण्याची व्यवस्था केली. जो तो होईल त्याप्रमाणे आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.
राजापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी रात्री पोहोचताच आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोवर सर्व गाळे जळून भस्मसात झाले होते. नाटे येथील अनेक युवकांबरोबरच साखरी नाटे येथील युवकांचाही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा सहभाग होता.




