अमरावती : प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर सात दिवसांनंतर स्थगित केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेटून राज्य शासनाच्या वतीने सफल शिष्टाई केली. काल चंद्रशेखर बावनकुळे ही समजूत काढण्यासाठी गेले होते. मात्र कडू यांनी त्यांच्या भाषेवर आक्षेप घेत आंदोलन सुरूच ठेवले होते. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार असलेले मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.14) आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांग यांच्या प्रश्नावर अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते. गेल्या सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्यावतीने बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मंत्री सामंत यांनी कडू यांच्या प्रश्नाबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे सांगितले. या प्रश्नांवर शासन कार्यवाही सुरू करील, असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग एकत्र आले हेच आंदोलनाचे यश : कडू
कर्जमाफी हा किचकट विषय आहे. त्यावर राज्य शासनाने लगेचच कार्यवाही करणे अपेक्षित नाही. मात्र, प्रशासनाने त्यावर कार्यवाही करून हा प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमचे आंदोलन हे जात किंवा धर्म याच्याशी निगडित नसल्याने ते अतिशय अवघड होते. त्याला प्रतिसाद मिळणे अतिशय कठीण असतानाही राज्यभरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला. मुख्यमंत्री या विषयावर बोलण्यास तयार नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत हात झटकले होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी आता कर्जमाफी या विषयावर कार्यवाहीत आणि हा प्रश्न विचारात घेणार असल्याचे सांगितले आहे. यानिमित्ताने राज्यभरात शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग एकत्र आले हेच आमचे आंदोलनाचे यश आहे, असे कडू यांनी सांगितले.
या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. या आंदोलनात नाशिकच्या गणेश निंबाळकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी देखील भाग घेतला होता. राज्य शासनाच्या वतीने यापूर्वीही प्रशासन तसेच मंत्र्यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बच्चू कडू हे आंदोलनावर ठाम राहिले. काल चंद्रशेखर बावनकुळे ही समजूत काढण्यासाठी गेले होते. मात्र कडू यांनी त्यांच्या भाषेवर आक्षेप घेत आंदोलन सुरूच ठेवले होते. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार असलेले मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.14) आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.





