रत्नागिरी : प्रतिनिधी
राजकारणात काहीही अशक्य नाही, असे म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय नुकताच राज्याच्या राजकारणात दिसून आला. ना. उदय सामंत यांच्या विरोधात राजकीय आखाड्यात जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांना उतरविण्याचे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळविण्याची घटना घडली. निलेश सांबरे यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून उदय सामंत यांच्या राजकीय विरोधकांना सणसणीत चपराक दिली आहे. या प्रवेशामागे उदय सामंत यांची राजकीय रणनीती असून त्यामुळे खऱ्याअर्थाने उदय सामंत यांनी विरोधकांना धोबीपछाड दिला आहे.
जिजाऊ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष निलेश सांबरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते.या ऐतिहासिक क्षणी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं निशाण हाती घेतलं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.
निलेश सांबरे हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहेत, गोर गरीबांसाठी मोफत शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली असून, शिंदे साहेबांचे नेतृत्व अधिक प्रभावी व व्यापक झाले आहे. शिवसेना पक्षाचा विस्तार आणि लोकसंपर्क अधिक बळकट होतोय, हे परिवर्तनाचं प्रतीक आहे, असे यावेळी उदय सामंत यांनी म्हटले.
निलेश सांबरे ह्यांच्या भगवान सांबरे रुग्णालयाच्या उदघाट्न समारंभाच्या कार्यक्रमामध्ये ना. उदय सामंत यांचे अनेक छुपे विरोधक व्यासपीठावर एकत्र येऊन निलेश सांबरे यांना उदय सामंत यांच्या विरोधात उतरविण्याचे मनसुबे आखत होते. परंतु राजकीय आखाड्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उदय सामंत ह्यांनी मास्टरस्ट्रोक मारत आपल्या विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवले. ना. उदय सामंत यांनी निलेश सांबरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेत निलेश सांबरे ह्यांना शिवसेनेचे उपनेते पद देखील मिळवून दिले. या प्रवेशामुळे भविष्यात कोकणामध्ये निलेश सांबरे यांना सोबत घेऊन शिवसेना वाढीचा प्रयत्न ना. उदय सामंत यांनी केला आहे. निलेश सांबरे यांचा पक्ष प्रवेश हा ना. उदय सामंत ह्यांच्या विरोधकांना मोठा धक्का असल्यामुळे हा पक्ष प्रवेश मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.




