रत्नागिरी : प्रतिनिधी
निलंबित शिक्षक कम तोतया पत्रकार प्रवीण रावसाहेब किणेचे अनेक कारनामे पुढे येत आहेत. लकी ड्रॉ कूपन काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहेच, शिवाय एक सात लाखाच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यात एका शिक्षकाला एकाचे पाच लाख करून फसवल्याचे प्रकरण असताना अन्य एका महिला शिक्षकाची खोटी सही मारून पतसंस्थेकडून कर्ज घेतल्याचे पुढे आले आहे. असे कारनामे असताना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे प्रकारही घडले आहेत. पत्रकारितेच्या नावाखाली जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी आपले असे कमाई करणारे हस्तक ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवीण किणे याच्यासह त्याच्याकडे काम करणाऱ्या अनेक वसुलीखोरांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ बदनाम होत आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रतिथयश उद्योजकाच्या जयगड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या एका हॉटेलच्या परिसरात अवैध घुसून या प्रवीण किणे आणि त्याच्या एका महिला साथीदाराने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे बांधकाम केल्याच्या परवानग्या कुठे आहेत? सीआरझेड उल्लंघन करण्यात आले आहे काय? आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला शूटिंग करून बातमी करायची आहे, वैगेरे वैगेरे. त्यावेळी तिथे असलेल्या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून त्याचे व त्याच्या साथीदाराचे शूटिंग केले. त्याला आत जाण्यास मज्जाव केला. ज्याला बातमी करायची आहे तो चुकीच्या गोष्टी शोधून बातमी करू शकतो, त्यालाच शोधपत्रकारिता म्हणतात. पण याला वसुली करायची होती म्हणून ही नौटंकी त्याने केली होती. मात्र एका सावधानी कर्मचाऱ्याने त्याचा हा बेबनाव हाणून पाडला. या खंडणीखोर तोतया पत्रकारामुळे संपूर्ण पत्रकार वर्तुळ बदनाम होत आहे. त्यामुळे याकडे पत्रकारांनी एकत्रित लक्ष घालणं गरजेचे आहे.





