सेतूसह महा ई सेवा केंद्रातील गर्दी कमी करण्यासाठी भाजपची प्रशासनाला सूचना
रत्नागिरी : प्रतिनिधी
शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू व तहसील कार्यालयामध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे गाव पातळीवर दाखले अर्ज देऊन तिथेच दाखले वितरीत करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी केली आहे. सेतू आणि महा ई सेवा केंद्रावर होणाऱ्या गर्दीवर उपाययोजना करण्यासाठी नलावडे यांनी काही सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तसे निवेदन त्यांनी उपजिल्हाधिकारी सौ.शुभांगी साठे यांची भेट घेऊन दिले.

यावेळी त्यांच्यासोबत कामगार मोर्चा प्रदेश सचिव लिलाधर भडकमकर, दीपक आपटे व इतर सहकारी उपस्थित होते. नलावडे यांनी उपजिल्हाधिकारी सौ.शुभांगी साठे यांच्यामार्फत प्रशासनाला विविध उपाययोजना सुचवल्या. त्यामध्ये सेतूमधील विविध कोरे फॉर्म ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध करण्यात यावेत, परिपूर्ण फॉर्म ग्रामपंचायतीमध्ये भरून घेऊन सेतूमधे जमा करून संबंधित प्राप्त दाखले परत ग्रामपंचायतीमध्ये द्यावेत, जिल्ह्यातील ७६५ पैकी ४६६ ईसेवा केंद्र बंद असून बंद असलेली किंवा कार्यरत नसलेली केंद्र त्वरित इतराना वितरित करण्यात यावीत, तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्याना निदान बसण्यासाठी खुर्च्या व स्वच्छ पाण्याची सोय करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. सेतू आणि महा इ सेवा केंद्रांची वस्तुस्थिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कानावर घालण्यात येणार आहे. यावेळी अडचणींवर उपाय योजना करण्याची ग्वाही उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांनी दिली.




