राजापूर : प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील सोलगाव देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या बंदीस्त घराच्या बाहेरील भागामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. या बिबट्याचा भूकेने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
सोलगाव देवीची गुरववाडी येथील वसंत गुरव हे मुंबईला वास्तव्यास असून त्यांचे घर बंदस्थितीत असते. बुधवारी दुपारी गुरव यांच्या घराशेजारी बिबट्या असल्याची शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याबाबत वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र घराबाहेर असलेला बिबट्या मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱयांमार्पत बिबट्याची तपासणी करण्यात आली. मृत बिबट्या मादी असून ५ महिने वयाचा असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच भूकेने बिबट्या मृत झाल्याचा अंदाजही वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरी परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, रत्नागिरी लेखापाल तानाजी पाटील, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार यांच्यासह अनिकेत मोरे, नितेश गुरव आदी उपस्थित होते.