उपसरपंच संजय निवळकर यांच्या पाठपुराव्याला यश, मिनी विद्युत वाहिनी केंद्राचे खा. नारायण राणे यांच्याहस्ते भूमिपूजन
रत्नागिरी : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत भोके स्टेशन ते निवळी बावनदी ही ५ किलोमिटरची मिनी विद्युत वाहिनी केंद्र मंजूर करण्यात आले. नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी हे विजवाहिनी केंद्र गावचे उपसरपंच संजय निवळकर यांच्या पाठपुराव्याने मंजूर करुन दिले. या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच निवळी येथे पार पडला. या कामामुळे निवळी गावातील कोकजे वठार, बावनदी, खापरे कोंड हा पावसाळ्यात अंधारात जाणारा भाग प्रकाशमान होणार आहे.
तालुक्यातील निवळी गावातील कोकजे वठार, बावनदी, खापरे कोंड हा भाग नदीलगत असून या गावांना विद्युत प्रवाह पूर्वीपासूनच संगमेश्वर तालुक्यातून केला जात होता. संगमेश्वर विद्युत वाहिनी ही नदीकाठच्या शेत जमिनीतून असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात वारंवार विद्युत प्रवाह खंडित होतो. नदी काठच्या दोन्ही वाड्यातील ग्रामस्थांना कायम काळोखात राहावे लागत होते. वीज नसल्यामुळे नळ कनेक्शनला पिण्याचे पाणी देखील मिळत नसे. तसेच व्यावसायिकांच्या सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने अतोनात नुकसान होत होते. यासाठी सन २०१७ पासून निवळी गावचे उपसरपंच संजय निवळकर यांनी महावितरण व केंद्र शासन यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून रत्नागिरीतील भोके केंद्रातून वीज मिळावी, या मागणीचा जोर धरलेला होता. परंतु सात वर्षांच्या कालखंडामध्ये कोणीही यामध्ये लक्ष घातले नसल्याने निवळी बावनदी पंधरा दिवस प्रकाशात तर पंधरा दिवस काळोखात राहत असे. निवळकर यांनी पाठपुरावा कायम ठेवत केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत भोके स्टेशन ते निवळी बावनदी ही ५ किलोमिटरची मिनी विद्युत वाहिनी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करून घेतली. नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी उपसरपंच संजय निवळकर यांच्या मागणीनुसार एका फोनवर ही मागणी पूर्ण करून दिली.या योजनेचा पाठपुरावा निवळी गावचे उपसरपंच श्री संजय निवळकर, महावितरणचे अधिकारी भंडारी यांनी मेहनत घेऊन केला होता. महावितरणचे कार्यकारी अभियंता साळी व भंडारी यांचे जनतेने आभार मानले.
या विद्युत वाहिनी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ नुकताच खासदार नारायण राणे यांच्याहस्ते निवळी गावात करण्यात आला. या योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यास माजी खासदार निलेश राणे साहेब हे सुद्धा उपस्थित होते. नारायण राणे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सुरेश निवळकर यांनी व निलेश राणे यांचे संतोष पाध्ये यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला विनायक मुकादम, विवेक मुळे, संतोष मालप, निलेश सावंत, रमित सावंत, विशाल सावंत, संतोष सावंत, पिंट्या मालप, प्रतिक मालप, भगवान मुकादम, किर काका तसेच गावच्या पोलिस पाटील संजना पवार, भालचंद्र शितप व इतर मान्यवर व ग्रामस्थ हे उपस्थित होते.