रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला पन्नास हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधत्मक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन रंगेहाथ पकडले आहे. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. विनायक रामचंद्र भोवड, वय ५७, रा.’स्वामी’ त्रिविक्रम नगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी असे संशयित आरोपी लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदारांचे सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी आरोपी विनायक भोवड याने दि. २६ जून २०२४ रोजी तक्रारदाराकडे स्वतःसाठी व ऑफिसला देण्यासाठी पन्नास हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून, मागणी केलेली लाच रक्कम दि. ११ जुलै १०२४ रोजी ११.५६ वाजता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी कार्यालयात पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपी लोकसेवक भोवड यांना लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचेवर शहर पोलीस ठाणे रत्नागिरी येथे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. हा सापळा पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, सपोफौ/संदीप ओगले, पोहवा/संतोष कोळेकर, पोहवा/विशाल नलावडे, पो.ना./दिपक आंबेकर, पो.कॉ./हेमंत पवार, पो.कॉ./राजेश गावकर यांनी रचला.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. संपर्क :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालय फोन नं. ०२३५२-२२२८९३