शिवभक्त सुभाष पारकर, अभिषेक भाटकर यात्रेवरून सुखरूप मायभूमीत दाखल
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीतील जाकिमिऱ्या अलावा येथील शिवभक्त सुभाष पारकर आणि कर्ला येथील शिवभक्त अभिषेक भाटकर हे दोघे या बारा ज्योतर्लिंगांचे दर्शन घेऊन रत्नागिरीत परतले आहे. सुमारे १० हजार किमीचा संपूर्ण प्रवास त्यांनी दुचाकीने केला हे विशेष ! रत्नागिरीत त्यांचे आगमन होताच त्यांच्या मित्रपरिवाराने जल्लोष करत स्वागत केले.
हिंदू धर्म प्रथा आणि पुराणातील संदर्भानुसार बारा ज्योतिर्लिंगे – सोमनाथ (गुजरात), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश), महांकाळेश्वर (मध्यप्रदेश), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), वैजनाथ (झारखंड), भीमाशंकर (महाराष्ट्र),रामेश्वर (तामिळनाडू), नागनाथ (गुजरात), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र), केदारनाथ (उत्तराखंड), घृष्णेश्वर (महाराष्ट्र) ही आहेत. हा संपूर्ण प्रवास १० हजार किमीचा आहे. या प्रवासाला रत्नागिरीतील या दोन शिवभक्तांनी १५ मे रोजी रत्नागिरीतून सुरुवात केली संपूर्ण प्रवास हा हिंदुस्थानच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या तीन दिशेला केला आहे. नुकतेच त्यांचे रत्नागिरीत आगमन झाले. रत्नागिरीच्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव कालभैरवाच्या आशीर्वादाने या प्रवासाला सुरुवात झाली होती. नुकताच हा प्रवास शेवटी याच भैरी मंदिरात येऊन महिन्याभराने पूर्ण झाला आहे.
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातून या तरुणांनी प्रवास केला. कलियुगात शिवभक्ती करणाऱ्या आणि शिवाच्या आशिर्वादासाठी रत्नागिरीतून दुचाकीने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पारकर आणि भाटकर रत्नागिरीत आले त्याचे कौतुक होत आहे. रत्नागिरीत हे दोघे येताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.