रत्नागिरी : प्रतिनिधी
येथील सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहार पद्धतींची माहिती देणारे अकाउंटिंग म्युझियम सुरू करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन सीए इन्स्टिट्यूटच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष मंगेश किनरे यांच्या हस्ते व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व सीए शाखाध्यक्ष अभिलाषा मुळ्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सीए मंगेश किनरे म्हणाले की, अकाउंटिंग म्युझियमचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. अकाउंटिंग हा फक्त शिकवण्याचा विषय नाही. ते एक विज्ञान आहे. अकाउंट्सचा इतिहास, त्याची महती विद्यार्थ्यांना कळली पाहिजे. अकाउंटिंगची संकल्पना कोणी आणली, त्यात कशी प्रगती होत गेली, हे या प्रदर्शनातून पाहता येईल. नफा-तोटा, व्यवहार याविषयीची माहिती मिळते.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा लाभली असून आता महाविद्यालय स्वायत्त दर्जाचे आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांना स्थानिक गरजेचे व व्यावसायिक अभ्यासक्रमही शिकता येत आहेत. केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण देणारी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी असून या अकाउंटिंग म्युझियममुळे विद्यार्थ्यांना पैशांचे मूल्य, व्यवहार पद्धतींची माहिती मिळणार आहे. यापूर्वी सीए इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमही शिकता आला आहे.
कार्यक्रमाला सीए शाखेचे उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी, माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे आणि सदस्य सीए प्रसाद आचरेकर, सीए मंदार गाडगीळ, सीए वरदराज पंडित, यांच्यासह रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, कॉमर्स शाखेच्या उपप्राचार्य प्रा. सीमा कदम, प्रा. सीए अजिंक्य पिलणकर, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. आनंद आंबेकर व प्राध्यापक उपस्थित होते.