रत्नागिरी जिल्ह्यात ‘पदवीधर’साठी साडेबावीस हजार मतदारांची नोंदणी
रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्याची मतदारांची संख्या मागील वेळेपेक्षा ४० टक्क्यांनी वाढली आहे. मागील निवडणुकीवेळी १६ हजार २२२ मतदार होते. ती संख्या २२ हजार ६८१ वर पोहोचली आहे. मात्र हा आकडा पाहता पदवीधर मतदारांच्या नोंदणीतील अनास्था पुढे आली आहे. दरवर्षी शेकडो तरुण-तरुणी रत्नागिरी जिल्ह्यातून पदवीधर होतात. मात्र पदवीधर मतदार नोंदणीसाठी अनास्था दिसत आहे. ही अनास्था राजकीय पक्ष, जिल्हा प्रशासन आणि पदवीधरांमध्ये आहे. कोकणात लाखो पदवीधर असताना नोंदणी हजारात होते, ही शोकांतिका आहे, लोकशाहीसाठी हे घातक आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघात ७ जुलैला मुदत संपणार असून त्याकरिता ३१ मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. अर्ज भरणे, छाननी, मागे घेणे या प्रक्रियेनंतर २६ जूनला मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. १ जुलैला नेरूळ, नवी मुंबईतील आगरीकोळी संस्कृती भवन येथे मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांच्या सूचनेनुसार, ८०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र नियुक्त केले आहे जेणेकरून मतदारांची गर्दी न होता सुरळीत मतदान होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात स्त्री मतदार ९ हजार २२८ आणि पुरुष मतदार १३हजार ४५३ आहेत. मागीत निवडणुकीत २६ मतदान केंद्रे होती. आता ती ३८ करण्यात आली आहेत. मतदार केंद्रावर २५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी, कर्मचारी २५ जूनला अल्पबचत सभागृह येथून सर्व साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होतील. २६ जूनला सकाळी मतदान सुरू होईल. मतदारांना मतपत्रिका देण्यात येणार असून, त्यांना प्राधान्यक्रमाने मतदान करावयाचे आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मतपत्रिका व सर्व साहित्य सील करण्यात येईल. त्यानंतर सर्व गोपनीय साहित्य खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे एकत्रीकरण करून सुरक्षितरित्या पनवेलला स्ट्राँगरूमला पोहोचवण्यात येणार आहेत.
मतदानासाठी सुरक्षितता म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त, फिरते पथक व व्हिडिओ चित्रीकरण या द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी ३८ वाहने, भरारीपथके व तालुकानिहाय पथकांसाठी १८ वाहने, राखीव वाहने ९, मतपेट्या मतमोजणी केंद्रावर नेण्यासाठी मिनी ट्रकची व्यवस्था केली आहे.