रत्नागिरी : प्रतिनिधी
बाल मजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता आपल्या परिसरामध्ये कोठेही बालकामगार दिसल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले.
जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष संलग्न चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल कामगार विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी बाजारपेठ परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सहाय्यक लोक अभिरक्षक यतिन धुरत, डेप्युटी चिफ लिगल हेड डिफेन्स काउंन्सिल उन्मेश मुळ्ये, असिस्टंट लिगल हेड डिफेन्स काउंन्सिल गौरव भाटकर, पर्यवेक्षक श्रीम. खांडेकर, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. हावळे म्हणाले, बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम १९८६ व सुधारित अधिसूचना २०१६ नुसार सर्वच व्यवसायिक व प्रक्रियामध्ये १४ वर्षा खालील बालकांस काम करावयास प्रतिबंध आहे. त्याचप्रमाणे बाल मजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता आपल्या परिसरामध्ये कोठेही बालकामगार दिसल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क करण्याचे आवाहन श्री. श्रीकांत हावळे यांनी उपस्थित कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांना केले.
श्रीम. समृद्धी वीर म्हणाल्या, १४ वर्षा खालील बालकास कोठेही कामावर ठेवल्याचे आढळल्यास रुपये २० हजार दंड आणि १ वर्षाची जबर शिक्षा कायद्याने तरतूद केली आहे. तर १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवल्यास दुकान मालकावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. या फौजदारी गुन्ह्यामध्ये ६ महिने व २ वर्षापर्यंत शिक्षा व २० हजार रुपये ते ५० हजार रुपये इतका दंड किंवा दोन्ही स्वरुपाची शिक्षा होते. त्यामुळे आपल्या आस्थापनामध्ये कोठेही बालमजुर ठेवू नका असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती वीर यांनी केले.
श्रीमती अन्वी शिंदे म्हणाल्या, बालकामगारास आर्थिक, कौटुंबिक किंवा सामाजिक कारणामुळे कोवळ्या वयातच अर्थार्जनाची कास धरावी लागते. या प्रश्नाकडे केवळ कायद्याखालील तरतुदी व त्याअंतर्गत असलेल्या उपाययोजना पुरते मर्यादित दृष्टिने न पहाता बालमजुरी या प्रश्नाच्या निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता आणि त्या समस्येकडे पहाण्याच्या दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे.
रॅलीची सुरुवात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कुलकर्णी कंपाउंड रत्नागिरी येथून धनजी नाका ते मारुती आळी ते गोखले नाका ते स्वा. सावरकर चौक येथे समाप्त करण्यात आली. बंद करा बंद करा बालमजुरी बंद करा, बालमजुरी सोडा शिक्षणाशी नाते जोडा यासारख्या घोषणा देत अंगणवाडी सेविका यांनी बाजार परिसरामध्ये जागृकता निर्माण केली.