रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील “आरजू टेक्सोल कंपनी” फसवणूक प्रकरणात प्रसाद शशिकांत फडके याला पाेलिसांनी अटक केली. सुमारे ८०० हुन अधिक लोकांची ‘आर्जु’कडून फसवणूक झाल्याची चर्चा आहे. मराठी माणसाला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आरजू कंपनीच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याची कुजबुज राज्यभरात सुरू आहे. नुकताच पुण्यातील वैभव कांबळे नावाच्या फसवणूक झालेल्या युवकाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. यात या गंडा घालणाऱ्या आरोपी प्रसाद शशिकांत फडके आणि इतर सहकाऱ्यांच्या मागे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत याचा हात असल्याचा आरोप जनतेच्या हवाल्याने करण्यात आला आहे. यात कितपत तथ्य आहे हे उदय सामंत, आरोपी प्रसाद फडके व सहकाऱ्यांना माहित! सामंत यांनी फडके आणि त्याच्या सहकाऱ्यांचा आपल्या पक्षाशी काडीचा संबंध नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे.
प्रसाद फडके हा मूळचा गावखडी येथील रहिवासी असून तो सामंत समर्थक म्हणून रत्नागिरी तालुक्यात परिचित आहे. गावखडी गावात सामंत यांच्या निवडणुकीत प्रसाद आणि फडके परिवार कायम सक्रिय असतो. एकाअर्थाने सामंत समर्थक म्हणून प्रसाद रत्नागिरी तालुक्याला परिचित आहे. सामंत राष्ट्रवादीत असताना फडके परिवार त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत होता. नंतर सामंत शिवसेनेत आले आणि हा परिवार शिवसेनेत अधिकृत आला. सामंत गुवाहाटीला गेले आणि शिंदेवासी झाले तेव्हा फडके परिवार शिंदेवासी अर्थात सामंत समर्थक झाले. राजकारणात सामंत जिथे तिथे फडके असे समीकरण बनले. मात्र तरीही सामंत यांनी फडके याचा आपल्या पक्षाशी काडीचा संबंध नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे.
आरोपी प्रसाद फडके यांनी गुंतवणूकदारांना सामंत आपल्या मागे आहेत, असे सांगितले असेल आणि त्याची कल्पना सामंत यांना नसेल तर ते सामंत यांचे दुर्दैव आहे. राज्यात कोकणचे प्रतिनिधित्व करणारे सामंत या एका घटनेमुळे राज्यातील कानाकोपऱ्यात बदनाम होत आहेत. त्यामुळे सामंत यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी. उगाच सामंत यांच्या नावामुळे रत्नागिरी बदनाम व्हायला नको. आधीच पुण्याच्या कोथरूड येथील गंडलेल्या तरुणाने एका चॅनेलला व्हिडिओ देऊन रत्नागिरीला बदनाम केले आहे. त्यात अजून भर नको. त्यामुळे सामंत यावर भूमिका स्पष्ट करायला हवी.
पोलिसांनी फिर्याद का घेतली नाही? कुलकर्णी उत्तर देतील काय?
कोथरूड येथील त्या युवकाच्या आरोपानुसार कोथरूड पोलीस, रत्नागिरी पोलीस यांनी त्या पीडित तरुणाची तक्रार घेण्यास नकार दिला. हा नकार कोणाच्या आदेशाने दिला की पोलिसांनी आपल्या कामात कसूर केली? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. एक तरुण कोथरूडमधून रत्नागिरीत येऊन फिर्याद द्यायची असे पोलिसांना सांगतो आणि पोलीस फिर्याद घेत नाहीत, यामागे नेमके गूढ काय? याचा खुलासा जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी करायला हवा. गुंतवणूकदार आणि जनतेला पोलिसांनी असे का केले, याबाबत माहिती द्यायला नको का? त्यामुळे कुलकर्णी यावर नक्कीच खुलासा करतील, यात शंकाच नाही.