रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावर दि. २४ मे रोजी सावर्डे ते भोकेदरम्यान अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा लांबपल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
यासंदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील भोकेदरम्यान दि. २४ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते ९.३० असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळ एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (१२६१७) ही दि. २३ रोजी प्रवास सुरु होणारी सुपरफास्ट गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ५० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे. याचबरोबर तिरुनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी दि. २३ मे रोजी प्रवास सुरु होणारी गाडी (२०९२३) कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर दि. २४ रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास १० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.




