मुंबई : प्रतिनिधी
राज्यात उकाड्याने सर्व नागरिक हैराण आहे. मात्र राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. आता राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येत्या ३ ते ४ तासात जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, रायगड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल झाल्यांनतर तो पुढे सरकला असून येत्या २४ तासात दक्षिण – पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवेल. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांत अलर्ट जारी केला आहे. राज्यात आज बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंगळवारी जळगावात सर्वाधिक तापमान ४३.९होते तर साताऱ्यात सर्वात कमी २१अंश तापमानाची नोंद झाली. पुढील २४तास मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ आणि निरभ्र राहण्याचे हवामान खात्यानं सांगितले. दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येथे ताशी ३० ते ४० किमीच्या वेगाने सुसाट वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.