सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बिनकामाचे, पाण्यासाठी वणवण
रत्नागिरी : प्रतिनिधी
कडक उन्हाळ्याबरोबरच भीषण पाणीटंचाईने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६१ गावातील १५८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. ४३९६० ग्रामस्थांना ११ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी कुचकामी ठरले आहेत. जिल्ह्यात पावसाचे पडणारे पाणी आणि वाया जाणारे पाणी याचे नियोजन करण्यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मागे राहिले आहेत. गेल्या कित्येक वर्षात जनतेला गृहीत धरून केवळ मतांसाठी गोड बोलणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची ही वेळ आहे, असा संतप्त उद्रेक जनतेतून ऐकू येत आहे.
मंडणगड तालुक्यातील एका गावातील एका वाडीतील १५८ ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. दापोली तालुक्यातील ८ गावातील १२ वाड्यांमधील ४०८२ ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. खेड तालुक्यातील ८ गावातील २६ वाड्यांमधील ३७७८ ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. चिपळूण तालुक्यातील १६ गावातील ३५ वाड्यांमधील ११३९१ ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. संगमेश्वर तालुक्यातील १५ गावातील २२ वाड्यांमधील २५०७ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
रत्नागिरी तालुक्यातील १० गावातील २७ वाड्यांमधील २१४२३ ग्रामस्थांना ५ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. लांजा तालुक्यातील ३ गावातील ५ वाड्यांमधील ७२५ ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात एकूण ६१ गावातील १५८ वाड्यांमधील ४३९६० ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरु आहे. ४ शासकीय आणि ७ खासगी अशा एकूण ११ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
जानेवारीपासून पाणीटंचाई उग्र रूप धारण करते ते अगदी जून महिन्यापर्यंत भीषण रूप होते. यावर कायमची उपाययोजना करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. एकीकडे ही भीषण परिस्थिती असताना जिल्ह्यातील आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य बिनकामाचे ठरले आहेत. पावसाच्या पाण्याचे नियोजन, धरणाची निर्मिती, जुन्या धरणांची डागडुजी, जल जीवन मिशन योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यात लोकप्रतिनिधी कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे आजही १५८ वाड्यांमधील ग्रामस्थांना पाणी पाणी करावे लागत आहे.