नाचणे येथील युवक अभिजित पटवर्धन यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
रत्नागिरी : प्रतिनिधी
तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील विमानतळाला सर दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन यांचे नाव देऊन त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करावा, अशी मागणी नाचणे येथील युवा नेतृत्व अभिजित पटवर्धन यांनी केली आहे. या मागणीचे पत्र नुकतेच त्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या मागणीवर शासस्तरावरून हिरवा कंदील देऊन सर पटवर्धन यांनी आदरांजली वाहावी, असे मागणी पत्रात अभिजित पटवर्धन यांनी म्हटले आहे.
कोण होते दत्तात्रय पटवर्धन?
दिनांक १० जुलै १८८३ रत्नागिरी येथे एका अतुलनीय पराक्रम करणाऱ्या बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन ऊर्फ डी लॅकमन पॅट. पटवर्धन यांना आसपासच्या परिसरात ‘दत्तू’ म्हणून ओळखले जात असे. ५ वीनंतर त्यांचे वडील लखुतात्या यांनी त्यांना कोल्हापूरला पाठवले व पुढे मुंबईला गेले. मुंबईत ६ महिन्यांसाठी त्यांनी कुली म्हणून काम केले. माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये त्यांनी वायरमॅन म्हणून नोकरी मिळवली आणि शेवटी रेल्वे इंजिन ड्राइव्हर बनले.ब्रिटीश राज्यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी त्याने आपले नाव “डी लेकमन पॅट” असे नाव दिले होते.
एके दिवशी ते कोळशाच्या बॅगमध्ये लपून ते “स्ट्रॅन्स फेलश” नावाच्या जर्मन जहाजावर पोहचले. जहाज समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर कॅप्टन हेनरिक जोदेल यांना भेटले आणि त्यांनी जहाजावरील वायरमॅन कम इंजिन देखरेख ठेवण्याचे काम केले. हेनरिक जोदेलने त्यांची पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे सोबत घेतली व त्यांनी मरीन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हॅम्बर्ग येथे त्यांची नोंदणी केली. पदवी पूर्ण केल्यानंतर दत्तू स्कॉटलंडला गेले आणि त्यांनी “ओशन-किंग” नावाने दुसऱ्या जहाजात समुद्रात प्रवेश केला.
१९११ पासून या जहाजाने लिव्हरपूल ते न्यूयॉर्क येथे प्रवास केला होता. त्यानंतर १९१२ मध्ये त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे त्यांना ‘तुकाराम’ नावाच्या जहाजाचे इंजिन तयार करण्यासाठी मुंबई येथे पाठविले गेले. १९१४ च्या सुरुवातीस प्रथम विश्वयुद्ध संपले तेव्हा दत्तू यांनी ब्रिटिश वॉर ऑफिसला कळविले आणि ‘एम्बुलन्स कॉर्प्स’ मध्ये प्रवेश केला. त्याच्या निष्ठेमुळे त्याला सैनिक म्हणून पद देण्यात आले आणि “ससेक्स ब्रिगेड” मध्ये सामील होण्यासाठी सांगितले . त्यांनी तोफा, इतर शस्त्रे हाताळली. ते फ्रान्सच्या युद्ध मोर्चात सामील झाले. फ्रान्समध्ये असताना त्यांना ‘रॉयल वायुसेना’ मध्ये पायलट म्हणून सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले गेले आणि वाहतूक आणि बॉम्बर विमान दोन्ही चालविणे सुरू केले. त्यानंतर त्यांना तज्ज्ञ म्हणून ओळखले गेले. या कार्यकाळात दत्तूने जर्मनीची राजधानी बर्लिनवर विमानातून बॉम्ब वर्षाव केला होता. त्याच्यावर गोळीबार होत असतानाही कसलीही पर्वा न करता ‘कैसर पॅलेस’ वर हल्ला केला होता. युद्धादरम्यान बर्लिनवर हल्ला करणारा प्रथम बॉम्बर पायलट म्हणून जगात ओळखले गेले. या विलक्षण बहादुरतेसाठी त्यांना इंग्लंड चे राजा जॉर्ज ५ वे यांनी त्यांना “स्वॉर्ड ऑफ मिलिटरी ऑनर” हा बहुमान दिला.
दत्तूने राजा जॉर्ज ५ यांच्या समोर कबुल केले की सैन्यात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलले होते. राजाने त्याच्या खंबीरतेची प्रशंसा केली आणि त्याला “आमच्या वायुसेनातील एक यंग मराठा” असे संबोधले त्याच बरोबर त्यांनी असे आदेश दिले कि दत्तू यांच्या वर कसलीही कारवाई करण्यात येऊ नये. ही घटना २४ एप्रिल १९१९ ची. दत्तूला आरएएफमध्ये लेफ्टनंट म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांना १२००.०० प्रति मासिक वेतन मिळत होते. ‘माझ्या आयुष्यात हा एक महान क्षण आहे’ असे उद्गार काढले . १९२१ साली मुंबईच्या राज्यपालांनी दत्तू यांना रॉयल अतिथी म्हणून दोन दिवस त्यांच्या निवासस्थानात आमंत्रित केले. नंतर दत्तू रत्नागिरीला परतले.
अमरावतीच्या चंद्राताई शेवडे यांच्याशी विवाह केला. १९३० मध्ये ते निवृत्त झाले. आरएएफमधील त्यांचे साहसीपणा आणि करियरचा हा संपूर्ण भाग २५ मार्च १९११ ला लंडन गॅझेटमध्ये प्रकाशित झाला. तसेच इंग्लंडचे वृत्तपत्र आणि ‘ग्राफिक’ यांनी १३ मे १९१९ रोजी त्यांचे लेख लिहिले. भारतात ‘केसरी’ दिनांक १३ मे १९१९ वृत्तपत्र मध्ये देखील त्यांचा लेख प्रसिध्द झाला. “इंडिया फर्स्ट एविएटर” नावाचे पुस्तक १८ ऑक्टोबर २००३ रोजी प्रकाशित झाले. हे रत्नाकर शिवराम वाशीकर आणि अनंत रामचंद्र मराठे यांनी संयुक्तपणे लिहिले होते.
१९३९ साली द्वितीय विश्वयुद्ध सुरू झाल्यानंतर दत्तू यांना दिल्ली येथे अखिल भारतीय सैन्य, नौदल व वायुसेना अकादमी स्थापन करण्यास सांगण्यात आले. या अकादमीत दत्तू नी तीन सेवांच्या अनेक सैनिकांना प्रशिक्षित केले. १८ ऑक्टोबर १९४३ रोजी कर्करोगाने ग्रस्त असलेला हा धाडसी सैनिक मरण पावला. त्यांची पत्नी आणि एकुलता एक मुलगा नागपूरमध्ये स्थायिक झाला होता. त्यांचे नातू प्रभाकर पटवर्धन आता आपली अभियांत्रिकी कंपनी कांदिवली येथे चालवत आहेत. जेटीडी टाटा यांना नेहमीच १९२७ मध्ये विमान उड्डाण करणारे पहिले विमानवाहक म्हणून ओळखले गेले होते परंतु दत्तूने १९१४ मध्ये बॉम्बर विमानाचे उड्डाण केले होते आणि स्वत: ला निष्णात केले होते. दत्तात्रय पटवर्धन यांचे १८ ऑक्टोबर १९४३ रोजी निधन झाले.