नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे गुरुवारी नाशिकला आल्या होत्या. पण, महिला मेळाव्याला गर्दी न जमल्याने हा प्रचाराचा मेळावा रद्द करावा लागला. खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठीची नीलम गोऱ्हे यांची सभा रद्द करण्याची नामुष्की अखेर शिवसेना शिंदे गटावर नाशिकमध्ये आली.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी जोरदार शक्ति प्रदर्शन करीत सभा, प्रचार फेऱ्या आणि मेळावे घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शहरात अनेक नेत्यांचे दौरे होत आहेत. या कार्यक्रमांना गर्दी जमा करणे, ही उमेदवारांना डोकेदुखी ठरू लागल्याचे चित्र आहे. अशीच एक नामुष्की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार गोडसे यांच्यावर आली.
खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार होता. या मेळाव्याची तयारी दोन दिवस आधीच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. यावेळी सात ते आठ हजार महिला उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात महिला पदाधिकाऱ्यांना किती गर्दी जमा करणार, अशी विचारणा केल्यावर या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या यादीनुसार ८०० ते ९०० महिलांचीच गर्दी होण्याची संभावना होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच वादावादी झाली. विविध उपाय करूनही सात ते आठ हजार महिला उपस्थित ठेवणे अशक्य होते. पदाधिकाऱ्यांच्या मर्यादा लक्षात आल्यावर ऐनवेळी पक्षाने आपल्या प्रचार मेळावा रद्द केला. खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठीची नीलम गोऱ्हे यांची सभा रद्द करण्याची नामुष्की शिवसेना शिंदे गटावर आली.
खासदार गोडसे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे विविध पदाधिकारी शहरात दाखल झाले आहेत. स्थानिक पदाधिकारीही सक्रिय झाले आहेत. मात्र, प्रचाराचा ताण सगळ्या यंत्रणेवर आलेला दिसतो. महिला मेळाव्याची तयारी अयशस्वी झाल्याने सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्या सभा घेण्याच्या तयारीनेच आल्या होत्या. मात्र, गर्दी न जमल्याने ऐनवेळी महिलांचा मेळावा रद्द करण्याची नामुष्की आली.