मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दीड दशकापासून रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हा प्रश्न चाकरमानी आणि कोकणवासियांना पडला आहे. गणपती, होळी, शिमगा या सणांसाठी या महामार्गे गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाणे खूप त्रासदायक ठरते. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे वाहतूक कोंडीचा सामनादेखील करावा लागतो. मात्र आता मुंबई-गोवा महामार्गाचे काम जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी उज्वल निकम रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नितीन गडकरी बोलत होते.
चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जूनअखेरीस पूर्ण होणार आहे, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईतून गोव्याला पोहोचणे पाच तासांत शक्य होणार आहे, असंही गडकरी यांनी म्हटले आहे.
गडकरी यांनी म्हटलं आहे की, कोकणवासियांच्या मागणीनुसार आम्ही बीपीटीमधून रोरो सेवा सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही वाहने थेट रोरोद्वारे अलिबागला घेऊन जाऊ शकता. अलिबागहून मुंबई-गोवा महामार्गाला तुम्ही जोडले जाऊ शकता. मुंबईतून अलिबाग जो प्रवास रस्ते मार्गे साडेतीन तासांचा आहे तो रो-रो मुळं पाऊण तासात होतो. यामुळं कोकणातून मुंबईत व्यवसायासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांचा प्रवास सोप्पा होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ शकते. अशावेळी त्या अगोदर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले तर त्याचा फायदा प्रवाशांना होईल. कित्येकदा महामार्गाच्या कामांमुळे कित्येक तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून बसावे लागते. त्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. अशातच जर गणेशोत्सवाच्या आधी महामार्ग सुरू झाला तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.