महाधनेश (Great Hornbill) ग्रेट हॉर्नबिल :
हा भारतीय उपखंड, मुख्यभू आग्नेय आशिया, व द्वीपीय आग्नेय आशियातले सुमात्रा बेट या भूप्रदेशांत आढळणारा धनेश पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. या पक्ष्यांची चोच फार मोठी व शिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहेभारतात धनेशाच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा असतो. मोठ्या धनेशाची लांबी सुमारे १३० सेंमी. असते. डोके, पाठ छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो. मान व पोट पांडरे असते, शेपटी लांब व पांढरी असून तिच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात. चोच मोठी मजबूत बाकदार व पिवळी असते, डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे शिरस्त्राण असते, त्याचा रंग पिवळा असून वरचे पृष्ठ खोलगट असते, पायांचा रंग काळपट असतो.उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड खूप अंतरावर ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात. अंडी घालण्याच्या सुमारास मादी एखाद्या उंच झाडाच्या खोडातल्या उंचीवर असलेल्या ढोलीत जाते. ही ढोली यांचे घरटे होय. स्वतःची विष्ठा आणि नराने आणलेला चिखल यांच्या मिश्रणाने ती ढोलीच्या कडा लिंपते. चोच आतबाहेर करता येईल एवढीच उभी फट त्यात ठेवते. मादी या वेळी खरीखुरी बंदिवान होते. नर वरचेवर खाद्यपदार्थ आपल्या चोचीतून आणतो आणि ती फटीतून चोच बाहेर काढून ते खाते. पिल्ले सुरक्षित बाहेर पडेपर्यंत तिला भरवावे लागते. बंदीवासात असताना मोठ्या धनेशाच्या मादीची पिसे गळून पडतात व नवी उगवतात. पिल्ले १५ दिवसांची झाल्यावर मादी ढोलीवरील लिंपण चोचीने फोडून बाहेर पडते, पण पिल्ले आतच असतात. सामान्यतः बाहेर पडल्यावर मादी दार पुन्हा लिंपून टाकते. त्यानंतर पिल्ले मोठी होऊन बाहेर येईपर्यंत नर आणि मादी दोघे त्यांना भरवतात.–अमलेश तांबे (पक्षीमित्र तथा छायाचित्रकार)