जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी / जांभळा शिंजीर (Purple Rumped Sunbird) :
चिमणीपेक्षा थोडा लहान म्हणजेच साधारण १०-१२ सें. मी. आकाराचा असतो. नराचे डोके, छातीचा भाग हिरवा, नारिंगी, जांभळ्या रंगाचे मिश्रण असते तर पोटाखालचा भाग पिवळा असतो. मादीचा रंग वरील भागात तपकिरी तर खालून फिकट पिवळा असतो. काळपट रंगाचे पंख आणि पोटाखालाचा भाग जास्त पिवळ्या रंगाचा असतो. भारतामध्ये अनेकठिकाणी हा पक्षी पाहायला मिळतो. रत्नागिरीमध्येही याचे वास्तव्य असून, आपल्याकडेही अनेक भागामध्ये हा आढळतो. याचा साधारणपणे मार्च ते मे हा वीण हंगाम असून, विणीच्या हंगामात एखाद्या ठिकाणी बसून नर आपले पंख खाली-वर करत सुरात गात बसतो. मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते, त्यांवर करडे ठिपके असतात. मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात. त्याचे घरटे सुरेख असून मोठ्या कौशल्याने बनविलेले असते आणि जमिनीपासून सु. २ मी. उंचीवर एखाद्या काटेरी वेलीला किंवा झुडपाला टांगलेले असते. या लोंबत्या घरट्यात येण्याजाण्यासाठी एका बाजूस वाटोळे भोक असून त्याच्यावर पोस्टाच्या पेटीसारखे झाकण असते.या पक्षाचा अधिवास हा झुडूप असलेला प्रदेश, उपजाऊ किंवा कोरडवाहू शेतजमीन, तसेच शहरी भागामध्ये बगीचे, अश्या ठिकाणी जास्त करून असतो. फुलामधील मकरंद, कीटक, कोळी हे या पक्षाचे प्रमुख खाद्य आहे.– अमलेश तांबे (पक्षीमित्र तथा छायाचित्रकार)