महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन
राजापूर : प्रतिनिधी
बेरोजगारीची कोकणात मोठी समस्या आहे. मुंबईत नोकऱ्या राहिल्या नाहीत. कोकणात उद्योगधंदे यावेत, तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात. मला निवडून दिल्यास उद्योजक आणणे आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे हा माझा पहिला कार्यक्रम असेल. तुमच्या आशीर्वादामुळे मागील सुमारे चाळीस वर्षे मी विविध पदावर आहे. माझ्या प्रयत्नाला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, केसरकर, उदय सामंत यांची साथ देत आहेत. कोकणचा कॅलिफोर्निया करू. प्रगती करू. ४०० पार कोकणचा तुमचा हक्काचा खासदार असावा यासाठी ७ तारीखला कमळ निशाणीवर मतदान करून आपण मला सेवा करण्याची संधी द्यावी. असे प्रतिपादन ना. नारायण राणे यांनी केले.
महायुतीच्यावतीने राजापूर राजीव गांधी मैदान येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले आहेत. या सभेला महायुतीचे उमेदवार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, मंत्री दिपक केसरकर, मुंबई बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित आहेत. या सभेत केंद्रीय मंत्री, महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ही निवडणूक आपल्या भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी महत्त्वाची आहे. भाजप ४०० पारचा नारा दिला आहे. मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचा संकल्प झाला आहे. कोकणातली ४०० मधली जागा ही आपली असावी म्हणून हा आपला प्रचार सुरू आहे. जगात भारताचे नाव विकसित, भारत नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला. २०३० साली भारत तिसऱ्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही, अशा विश्वास मोदींनी देशाला दिला आहे. मागील दहा वर्षात ५४ योजना गरिबांसाठी दिल्या. कोरोना काळात अनेक कंपन्या बंद झाल्या. कामगार बेकार झाले होते. अशावेळी ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. स्वच्छ भारत योजनेखाली शौचालयाचा प्रश्न सोडवला. ८ कोटी घरात नळाने पाणी दिले. पावणे चार कोटी गरिबांना घरे दिली. आजारी माणूस पडला आजारपणासाठी उपचाराला आयुष्यमान भारत योजनेतून ५ लाखापर्यंत मदतीची योजना आणली. उद्योगासाठी अनेक योजना जाहीर केल्या. परत मोदी असावेत. ही आपणा सर्वांची इच्छा आहे.