रत्नागिरीत महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेस थाटात प्रारंभ
रत्नागिरी : प्रतिनिधी
महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, कला जोपासण्याची संधी मिळावी. त्यात कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून पुन्हा ग्राहकसेवेसाठी जोमाने कामाला लागावे, यासाठी दरवर्षी क्रीडा व नाट्यस्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी केले. रत्नागिरीत महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेस थाटात प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात आयोजित महावितरणच्या कल्याण प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे व जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य अभियंता श्रीमती सुचित्रा गुजर, मुख्य अभियंता धनंजय औढेंकर (कल्याण परिमंडल), मुख्य अभियंता सुनिल काकडे (भांडुप परिमंडल), अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना रेशमे यांनी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल सर्वांचे कौतुक केले. ग्राहकांना सेवा देणे व सेवेचे मोल वेळेत वसूल करणे, ही आपली जबाबदारी आहे. वसुली व खर्च यातील ताळमेळ बसविण्यासाठी वीज बिल वसुलीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट केले.