रत्नागिरी : प्रतिनिधी
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ट्रीपल तलाकबद्दल आपल्या भाषणांमधून अनेक वेळा वक्तव्य केली होती. त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. काँग्रेसने बाळासाहेबांच्या विचारांचा विरोध केला होता. त्यांच्याच मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत. त्यामुळे आमच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असे प्रतिपादन भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी रत्नागिरी ये
थे केले.
बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालय येथील आयोजित महायुतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते बाळ माने, शिवसेना नेते किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश सौंदळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंटी वणजू आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी बोलताना विनोद तावडे पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कोणाचेही फोटो नाही ना राहुल गांधींचा सोनिया गांधींचा ना खर्गेंचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा संपूर्ण जागतिक स्तरावर गवगवा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळीपासून आजपर्यंत त्यांनी एकदाही सुट्टी घेतली नाही. दिवसरात्र देशाचाच विचार केला. काँग्रेसच्या काळात ८० वेळा घटना दुरुस्त्या केल्या आणि आता तेच लोक आमच्यावर आरोप करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या सहानुभूतीचा विचार करतो. पण खरतर निवडणूक सहानुभूतीवर होत नाही. विकासकामे कशा पद्धतीने होत आहेत त्याच्या आधारावर लोक मतदान करत असतात. खासदार विनायक राऊत आजपर्यंत भाजपाच्या मतांच्या आधारावर निवडून येत होते. परंतु आता त्यांना विसर पडला आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मी आवाहन करतो की नारायण राणे यांच्यासारखा उमेदवार होणे नाही. ते निवडून आले तर कोकणात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आपण पाहू शकतो. विरोधी बाकावर बसून काही होत नसत. फक्त आरडाओरडा असतो. त्यासाठी नारायण राणे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व निवडून आले पाहिजे, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.