नवी दिल्ली : प्रतिनिधी
नागपूर आणि रत्नागिरी दरम्यानच्या महामार्गाच्या कामाबाबत राज्यसभेत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प येत्या ३ महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानच्या १५० किमी महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबाबत प्रश्न विचारला होता. विशेषतः हातखंबा जवळील कामाच्या विलंबाचे कारण त्यांनी विचारले होते.
यावर उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, या महामार्गाचे काम तीन टप्प्यांत (पॅकेजेस) सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे ८६% काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचे ७६% आणि तिसऱ्या टप्प्याचे ६५% काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन आणि वनविभागाच्या परवानग्यांमुळे काही ठिकाणी कामात अडथळे आले होते, परंतु आता हे प्रश्न मार्गी लागले आहेत.हा महामार्ग कोल्हापूरला रत्नागिरीशी जोडण्यासोबतच गोव्यापर्यंतची कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे. हा रस्ता लॉजिस्टिकच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. येत्या ३ महिन्यात १००% काम पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.”





