रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगारातील सहायक वाहतूक अधीक्षकाला अज्ञात कारणातून मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार साेमवारी घडला. याप्रकरणी तरुणाविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार पडलेला उद्दाम सहायक वाहतुक अधीक्षकाविरोधात याआधी अनेकांनी एसटी विभागात तक्रार केल्या आहेत. एकाने तर पोलिसात एनसी दाखल केली होती. मात्र तरीही या सहायक अधीक्षकाच्या वर्तनात फरक पडलेला नाही. आता असाच उद्दामपणा केल्याने त्याला मार पडला असे तिथे उपस्थित लोकांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल चंद्रशेखर नार्वेकर (वय ३६, रा. गोळपसडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रद्युम्न दत्तात्रय शिरधनकर (वय ५६, रा. पांडवनगर-नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी ते रत्नागिरीतील मध्यवर्ती बसस्थानकात रजिस्टर लिहिण्याचे काम करत होते. त्यावेळी निखिल नार्वेकर याने त्या ठिकाणी येऊन अज्ञात कारणातून शिरधनकर यांना ‘तुला माज आला आहे. तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन, तुला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांची मान टेबलवर दाबून मानेवर व पाठीवर हातांच्या ठोशाने मारहाण केली. या मारहाणीत शिरधनकर यांचे शर्ट फाटलं असून, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून तोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परंतु तिथे उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार या सहायक अधीक्षकाने आधी उद्दामपणा केला होता. त्यामुळे वादावादी झाली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.