लांजा : प्रतिनिधी
लांजा-राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघात आमदार किरण तथा भैय्या सामंत गावभेट दौरा सुरु आहे. निवडणुकीच्या पूर्वी जसे प्रत्येक गावात जाऊन जनतेशी आ. सामंत यांनी जसा प्रत्यक्ष संवाद साधला तसा संवाद ते आताही या दौऱ्यातून साधत आहेत. नुसता संवाद न साधता त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे जाग्यावरच समस्या आणि प्रश्न सोडवत आहेत. म्हणूनच कोकणच्या इतिहासात अलीकडच्या काळात जनतेशी थेट नाळ जोडून असलेला नेता म्हणून भैय्या सामंत यांचे नाव घेतले जात आहे.
आ. सामंत यांचा हा दौरा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता गावोगावी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा व त्या सोडवण्याचा प्रयत्न आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, महिला बचत गट, सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा क्षेत्रातील अडचणी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मांडल्या जात आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांचा आणि शासकीय योजनांचा लाभ न मिळाल्याने त्रस्त ग्रामस्थ आपल्या व्यथा मांडत आहेत. लोकप्रतिनिधी थेट त्यांच्या दारी येऊन चर्चा करत असल्याने ग्रामस्थही आपल्या समस्या सुटतील या विश्वासाने आमदार सामंत यांचे सर्वत्र स्वागत करत आहेत.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळवून देणे हीच माझी जबाबदारी आहे. कोणाच्याही कामात राजकीय भेदभाव वा वैयक्तिक मतभेद आड येणार नाहीत. माझा शत्रू असो वा मित्र, त्याचे काम झालेच पाहिजे, असे ठामपणे सांगत आहेत. दौऱ्यात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनाही ते थेट सूचना देत आहेत. कोणत्याही ग्रामस्थाची तक्रार प्रलंबित राहता कामा नये, सर्व विभागांनी समन्वय साधून समस्यांचे तातडीने निराकरण केले पाहिजे, असे ते आदेश देतात. त्यामुळे समस्या निराकारण होते.
रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची शाश्वत व्यवस्था, ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचे प्रश्न, आरोग्य केंद्रांची उभारणी व मजबुतीकरण, शालेय पायाभूत सुविधा, तरुणांसाठी क्रीडा साहित्य तसेच सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याने हा मतदारसंघ अल्पवधीत रोल मॉडेल बनेल यात शंकाच नाही.
एकंदरित पाहता, लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील या दौऱ्याने लोकप्रतिनिधी आणि जनतेमधील नाते अधिक घट्ट केले आहे. पारदर्शकतेवर आधारित राजकारणाचे उदाहरण म्हणून सामंत यांचे “दुश्मन असो वा मित्र, त्याचे काम झालेच पाहिजे” हे विधान ठरले आहे. या दौऱ्यानंतर विकासकामांना नवा वेग मिळेल आणि मतदारसंघातील सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.