गेल्या दहा वर्षात मोदींच्या लाटेवर स्वार होऊन निवडून गेलेले विनायक राऊत हे मतदारसंघात निष्क्रिय खासदार म्हणून नावलौकिक मिळविणारे ठरले आहेत. गेल्या दहा वर्षात विकासात्मक काम न करता केवळ भावनेचे राजकारण करून कोकणवासीयांना फसविणारा खासदार म्हणून शिक्का राऊत यांनी लावून घेतला आहे. महायुतीचे नारायण राणे यांनी त्यांच्या ३५ वर्षाच्या कार्यकाळात जी जबाबदारी मिळेल त्याचे सोने करत विकासाची गंगा कोकणात आणली. दुर्दैवाने मागील १० वर्षे त्या गंगेच्या प्रवाहात अडथळे आले, ते केवळ निष्क्रिय खासदार विनायक राऊत यांच्यासारख्या बिनकामाच्या राजकारणी खासदारमुळेच!
महायुतीचे नारायण राणे यांनी कोकणच्या विकासात योगदान दिले आहे. बेस्टचे अध्यक्ष असताना नारायण राणे यांनी कोकणातील ७५०० तरुणांना बेस्टमध्ये नोकरी लावून दिली. एकप्रकारे ७० हजार लोकांच्या उदरिर्वाहाचे पुण्य पदरात पाडून घेतले. त्याउलट विनायक राऊत यांनी जैतापूर प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प विरोधी काम करून प्रकल्प अडचणीत आणलेच पण पर्यावरणपूरक एकही उद्योग आणला नाही किंवा तरुणांच्या हाताला काम दिले नाही. आलेले प्रकल्प विरोध करायचा हे धोरण राबविले. विरोध केला मान्य परंतु विरोध करताना पर्यावरणपूरक प्रकल्प आणण्यासाठी तरी पाठपुरावा करायला नको का? कधी आणि कुठल्या प्रकल्पासाठी पाठपुरावा केल्याचे कोकणी माणसाला आठवत आहे काय?
स्वतःच्या मुलासाठी टोलचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाला ग्रहण लावले. राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग पूर्ण होतो. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात तो रखडतो, त्याचा पाठपुरावा विनायक राऊत यांनी केलाच नाही. तर दुसरीकडे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण त्यांच्या अखत्यारीत नसतानाही कोकणच्या प्रेमापोटी मुंबई गोवा महामार्ग कामाची सातत्याने पाहणी करतात. एक लेन पूर्ण होण्यासाठी १४ -१४ वेळा दौरा करतात. पाहणी करून ज्या त्रुटी आहेत त्या दूर करतात. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांनीही अनेकदा महामार्ग काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले. मात्र एकाही कोकणी माणसाने सांगावं की विनायक राऊत महामार्ग पाहणी करायला कधी गेले होते?
माचाळ पर्यटन स्थळ करून त्याचा विकास करण्यासाठी निधी आणल्याची बोंब विनायक राऊत मारत असतात. मात्र त्या ठिकाणी जागा घेणारे आमदार तत्कालीन आणि सध्याचे यांच्याच पक्षाचे आहेत. पर्यटन स्थळ विकसित करायला आमदार आणि खासदार यांनी जागा विकत घेणे बंधनकारक आहे काय? की राऊत यांनी स्वतःच्या पक्षातील आमदारांच्यासाठी हे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी घाट घातला ? सध्या या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पर्यटन विकास केलाय ? काहीच नाही. एक रस्ता करून विकास होत नसतो हे कळू नये यासारखे दुर्दैव ते कोणते? ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची साधने निर्माण न करता केवळ भावनेचे राजकारण करणारे राऊत निवडणूक आली की रत्नागिरीत असतात. इतरवेळी कुठे गायब होतात? मतदारसंघ वाऱ्यावर सोडून दहा वर्षात वाट लावणारे खासदार जनतेची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक विनायक राऊत यांना सोप्पी नाही.
सामंत यांना गद्दार म्हणणाऱ्या विनायक राऊत यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दोनवेळा खासदार होताना सामंत होते म्हणून विजय झाला हे विसरणे म्हणजे कृतघ्नपणा नव्हे काय ? म्हणजे जेवायचं एकाच ताटात आणि सोबती जेवण्याआधीच ताटात हात धुवायचे, ही नीती यावेळी महागात पडणार हे नक्की! ‘जिथे जिथे सामंत तिथे तिथे विजय’ हे गणित विनायक राऊत यांना चांगले माहित आहे. तरीही सामंत यांची मदत घेऊन सामंत यांना गद्दार म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. अर्थात सामंत किंवा महायुती या शब्दाला कचऱ्याच्या पेटीत टाकून देते. त्यामुळे राऊत यांनी गद्दार या शब्दाऐवजी विकासाचे व्हिजन मांडायला हवे. अर्थात ते मांडण्यासाठी व्हिजन असायला हवे.
ज्या पक्षाचे प्रमुख प्रभू श्रीरामाच्या भक्तांना हरामखोर म्हणत असतील, भगवतगितेपेक्षा कुराण वाचतो म्हणत सामाजिक दरी निर्माण करत असतील त्यांच्या नेत्याकडून म्हणजे विनायक राऊत यांच्याकडून काय अपेक्षा करायची? मला शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही असे म्हणणारे विनायक राऊत समस्त हिंदूंची अवहेलना करतात आणि ब्राह्मण समाज आक्रमक झाला म्हटल्यावर बंद खोलीत माफी मागतात. मग यांना माफिवीर म्हणू नये काय? आजही हे माफीवीर काँग्रेसच्या सोबत आहेत. ज्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जायला लागले तर मी माझ्या पक्षाचे दुकान बंद करेन अशी ग्वाही दिली होती. त्याच काँग्रेस पक्षासोबत जाऊन बाळासाहेब यांच्या विचारांची प्रतारणा आज झाली आहे. त्याला साथ देणारे विनायक राऊत हिंदुत्वाच्या बाजूने आहेत की विरोधात ? कारण काँग्रेसचे राहुल गांधी कायम हिंदुत्व विरोधी वक्तव्य करत असतात. एकदा विनायक राऊत यांनी हिंदुत्वाबद्दल भूमिका स्पष्ट करावी. ओठात एक आणि पोटात एक असे ठेवून हिंदूंचा विश्वासघात करू नये.
तूर्तास इतकेच!
लिहिते राहू…बोलते राहू..!
प्रा. योगेश हळदवणेकर
संपादक, रत्नदर्पण न्यूज





