नारायण तातू राणे…हे नाव राज्याच्या राजकारणात आणि आता देशाच्या राजकारणात गेल्या ४ दशकापासून सक्रिय आणि चर्चेत आहे. अवघ्या वीस वर्षांचे असताना नारायण राणे यांनी शिवसेनेचे काम चेंबूरमधून करायला सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव पडल्याने त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी शिवसेना तळागाळात रुजवली. अर्थात ‘बाळासाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ या ब्रिदानुसार समाजकारण आणि राजकारणात राणे एकेक पाऊल पुढे जात राहिले. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांनी घालून दिलेल्या मार्गावर राणे चालत राहिले. शिवसेना वाढविण्यात काही मोजक्या शिवसैनिकांचा हातभार आहे, त्यात नारायण राणे यांचा हात खूप मोठा आहे. त्यांच्या शिवसेनेबद्दल असलेल्या निष्ठेमुळे शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष असे चढत्या क्रमाने ते विधानसभेत पोहोचले. त्यांची विधिमंडळातील कारकीर्द गाजली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ही महत्त्वाची पदे भूषवली.
ज्या पदावर काम करायचं त्याला १००% न्याय द्यायचा, मग कोणताही पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद न करता काम करत राहायचे, हे राणे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आज जी बांडगुळे नारायण राणे यांच्या निष्ठेवर बोटं ठेवतात, त्यांनी बाळासाहेब यांनी पारखलेल्या हिऱ्याची म्हणजे पर्यायाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेची खिल्ली उडवली आहे. बाळासाहेब यांनी नारायण राणे नावाच्या हिऱ्याला पैलू पाडले, हे नारायण राणे आजही सर्वांना सांगतात. अगदी त्यांच्या आत्मचरित्रात त्याचा पदोपदी प्रत्यय येतो. मग बाळासाहेब यांची निवड चुकली असेल का? नक्कीच नाही. आजही राणे बाळासाहेब यांची आठवण आली की दिलखुलास बोलत असतात. बाळासाहेबांना विसरत नाहीत. सामान्य शिवसैनिकांनी याकडे लक्ष देऊन राणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली तयार झालेला नेता आहे, याचा विचार करायला हवा. आज बाळासाहेब असते तर शिवसेना-भाजप- मनसे युती पाहून आनंदले असते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री असा हा राणेंचा प्रवास आहे. केंद्रात मंत्री असलेले ‘दादा’ राणे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून मैदानात आहेत. त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक. या मातब्बर उमेदवाराच्या प्रचारासाठी महायुती सज्ज झाली आहे. भाजपने राणेंची दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी त्यांचा सामना आहे. लोकसभा निवडणुकीच्या या जागेवरील निकालावरच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत तरी दोन जिल्ह्यांतील जागावाटप तसेच उमेदवारीबाबत काही प्रमाणात गणिते अवलंबून आहेत. कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणाला आघाडी मिळते, याकडे लक्ष असेल. त्यामुळे ज्या विधानसभेत राणे यांना लीड असेल तिथले गणित तिथल्या विधानसभा निवडणुकीत त्या – त्या लोकप्रतिनिधीचे भवितव्य ठरवणार आहे.
राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार आल्यावर राणेंना महसूल मंत्रीपद मिळाले. राणेंनी संसदीय कामकाजात कौशल्य दाखवले. पुढे १९९९ मध्ये मनोहर जोशी यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रीपद अल्पकाळासाठी मिळाले. उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याने राणे हे २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र या काळात स्वत:ची एक प्रतिमा त्यांनी तयार केली. राणेंनी ऑक्टोबर २०१७ मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. याचे प्रभावक्षेत्र राज्यभरात होते. राणेंच्या पक्षाची भाजपशी जवळीक वाढल्याने शिवसेना अस्वस्थ झाली. स्थापनेनंतर दोनच वर्षांत त्यांनी पक्ष भाजपमध्ये विलीन केला. पुढे केंद्रात जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना संधी मिळाली. यात शपथविधीत पहिला क्रम त्यांचा होता. यावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना महत्त्व दिले हे दिसले.
कोकणात मराठा समाजातून आलेल्या या नेत्यावर भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली. कोकणच्या राजकारणावर मुंबईतील वातावरण आणि घडामोडींचा प्रभाव असतो. राणेंच्या रूपाने मुंबई व कोकणात लाभ होईल, हे नक्की आहे. तसेच इंडी आघाडीच्या विरोधात आक्रमक चेहरा म्हणूनही याचा लाभ होणार आहे . याखेरीज मुंबईतही राणेंना मानणारा वर्ग असून, कामगार संघटनांमध्ये त्यांचे काम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य तसेच सहकारी संस्थांवर त्यांचा पगडा आहे. सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीत भाजपकडे मोठा नेता नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेत तर भाजपचा एकही सदस्य नाही. यामुळेच नारायण राणेंना महत्त्वाचे पद दिले गेले. त्याचा फायदा दोन्ही जिल्ह्यांना झाला. निलेश राणे, नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांची साथ त्या विकासाच्या धोरणात दोन्ही जिल्ह्यात मिळत आहे. आता राणे यांच्या लोकप्रियतेचा तसेच निवडणुकीच्या अनुभवाचा लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. भाजपने राज्यसभेतील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना लोकांमधून निवडून जाण्यास सांगितले. त्यात नारायण राणे यांचाही क्रमांक लागतो. त्यामागे कोकणच्या विकासासाठी आणि मोदींच्या विकसित भारताच्या स्वप्नात सुंदर कोकण विकसित होण्यासाठी राणे हा चेहरा भाजपने दिला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग असा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. या भागात उद्धव ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी विस्कटलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचे प्राबल्य होते आणि आहे. या मतदारसंघातील सहापैकी चार आमदार महायुतीचे आहेत. तळकोकणातील जनता आपले नेतृत्व मानते हे दाखवून देण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राणे यांना आहे. गेली तीन वर्षे त्यांच्याकडे केंद्रात मंत्रीपद आहे. त्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केली आहेत. राणेंचा राजकारणातील अनुभव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता याची साथ त्यांना आहे. तळकोकणातील या लढाईत राणे हेच ‘दादा’ हे आहेत!





