दुबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार गडी राखून पराभूत करून इतिहास रचला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी भारताने २००२ आणि २०१३ मध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा केल्या. डॅरिल मिचेलने ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर मायकेल ब्रेसवेलने नाबाद ५१ धावांचे योगदान दिले. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. रोहितने ७६ धावा केल्या, तर शुभमनने ३१ धावांचे योगदान दिले. विराट कोहली (१), श्रेयस अय्यर (४८), अक्षर पटेल (२९) आणि हार्दिक पांड्या (१८) यांनीही संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. राहुलने नाबाद ३४ धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने विजयी फटका मारून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. रवींद्र जडेजाने विजयी फटका मारताच दुबईतील भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाने जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.