रत्नागिरी : प्रतिनिधी
माजी आमदार बाळ माने यांना त्यांच्या गावातूनच म्हणजेच मिऱ्या गावातून विरोध असल्याचे पुढे आले आहे. आज शहरातील नामांकित हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत गावातील ग्रामस्थांनी बाळ माने यांच्या धोरणावर सडकून टीका केली. एमआयडीसी विषयाचे भांडवल करून ग्रामस्थांची दिशाभूल करण्याची काम बाळ माने यांनी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पाच वर्षे आमदार असताना तालुक्यासाठी काही केला नाही आणि आत्ता गावामध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे म्हणजे स्वतः काही करायचे नाही, आणि ग्रामस्थांचे माथे भडकवण्याचे काम करायचे, हे धंदे बाळ माने यांचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दुसरीकडे याच गावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांच्या प्रचारासाठी सज्ज असल्याची भूमिका सामंत यांना भेटून स्पष्ट केली. या दोन घटना पाहता बाळ माने यांना गावातूनच विरोध असल्याचे पुढे आले आहे. सध्या मिऱ्या गावातून पालकमंत्री व महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना उत्स्फूर्त समर्थन मिळत असून विधानसभा मतदारसंघातही त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.
- ग्रामस्थांच्या मागणीनुसार एमआयडीसी रद्द
- ना. उदय सामंत यांना जोरदार समर्थन
- भाजपच्या कार्यकर्त्यांचाही सामंत यांना पाठिंबा
- महायुतीच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सज्ज
मिऱ्या ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाळ माने यांच्या निष्क्रियतेचे पाढे वाचण्यात आले. बाळ माने आमदार असताना मिऱ्या येथील शाळा सुधारता आली नाही. तालुक्यामध्ये त्यांच्या कार्यकाळात कोणतेही ठोस काम झाले नाही. गेल्या वीस वर्षानंतर आता आमदार होण्यासाठी गावात एमआयडीसी रद्द करण्यासाठी राजकारण करण्याचे काम माने करत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांना पत्रक पाठवून आपली घरे, मंदिरे एमआयडीसीमुळे उठवण्यात येतील, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण करण्यात येत आहे. जेव्हा आम्ही पालकमंत्री उदय सामंत यांना भेटून एमआयडीसीबद्दल सत्यता पडताळून पाहिली तेव्हा माने चुकीची माहिती गावात पसरवत असल्याचे सिद्ध झाले. ११ ऑक्टोबर रोजी उदय सामंत यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार एमआयडीसी रद्द केली. ही गोष्ट माने यांना माहित नव्हती. त्यामुळे कोणतीही माहिती न घेता गावात एमआयडीसी रद्द करण्यासाठी मला आमदार करा, असे चुकीचे आवाहन त्यांनी केले.
गावकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला योग्य मिळाला, गावात प्रदूषण होणार नसेल, कुणाचेही घर मंदिर स्थलांतरित होणार नसेल आणि स्थानिकांना रोजगार मिळणार असेल तर आमचा प्रकल्पाला विरोध नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. त्यामुळे भविष्यात या माळरान कातळाच्या जमिनीवरती कोणताही ग्रामस्थांच्या निकषात बसणारा प्रकल्प येणार असेल तर त्याला ग्रामस्थ विरोध करणार नाहीत. मात्र कोणताही प्रकल्प आणताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जावे आणि मग प्रकल्प राबवावा अशी मागणी ग्रामस्थांनी उदय सामंत यांच्याशी केली. त्यानुसार भविष्यात कोणताही प्रकल्प येणार असेल तर ग्रामस्थांशी चर्चा करूनच प्रकल्प राबवला जाईल असे आश्वासन सामंत यांनी दिल्याने आणि ग्रामस्थांना नको असणारी एमआयडीसी रद्द केल्याने ग्रामस्थांनी सामंत यांना समर्थन देण्याची भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे पंचक्रोशीतील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. मिऱ्या गावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही बाळ माने यांची साथ सोडत महायुतीच्या उदय भेटून समर्थन दिले. भाजपच्या या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे उदय सामंत यांनी स्वागत केले.