रत्नागिरी : प्रतिनिधी
जिल्ह्यातील राजकारण विधानसभा निवडणूकीमुळे महायुतीभोवती फिरत आहे. गुहागरचे माजी नगराध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य राजेश बेंडल यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बेंडल हे गुहागरमधून शिवसेना उमेदवार असू शकतात. या पक्षप्रवेशासंबंधी मंत्री उदय सामंत म्हणाले की, राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही विनंती केली आहे. त्यांना उमेदवारी मिळाली, तर ते निश्चित जिंकतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसीबाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या प्रस्थापित राजकिय पक्षांनी राजेश बेंडल यांना निवडणूक रिंगणात उतरवावे, असे कुणबी समाजातील नेत्यांकडून बोलले जात होते. तसेच श्री. बेंडल सुद्धा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. परंतु, गुहागर मतदार संघावार भाजप आणि शिवसेनेचा दावा असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला याठिकाणी उमेदवारी मिळणे कठीण झाले आहे. बहुसंख्य कुणबी आणि ओबीसी समाज असलेल्या गुहागर मतदार संघात राजेश बेंडल यांच्यासारखा ओबीसी चेहरा दिल्यास परिवर्तन होऊ शकतो, हा विचार करून माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
गुहागरचे माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांच्यानंतर गुहागर तालुक्यातील कोणत्याच प्रस्थापित राजकिय पक्षाने गुहागर विधानसभेकरिता बहुजन व बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला उमेदवारी दिली नाही. राजकीय पक्षांनी कुणबी समाजाला पंचायत समिती सदस्य, सभापती- उपसभापती आणि एखादवेळी जिल्हा परिषद सदस्य एवढ्यावरच बोळवण केली गेली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी कुणबी समाजातील सहदेव बेटकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा गुहागरमध्ये संपर्क न राहिल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र आता कुणबी समाजाला प्रतिनिधित्व शिवसेना देत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राजेश बेंडल यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठाकडे मागणी केली होती. त्याचबरोबर त्यांनी मतदार संघात आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गाठीभेटी सुरु केल्या होत्या. राजेश बेंडल यांचा राजकीय प्रवास पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सभापती असा झाला. या काळात त्यांनी गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरी क्षेत्रात काम करताना गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागात विकास कामे केली. अनुभवाच्या बळावर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधुन निधी आणला. परंतु, या मतदार संघावार भाजप आणि शिवसेनेने दावा केल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारीचा विषय मागे पडला. लोकसभा निवडणुकी दरम्यान, शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी गुहागर विधानसभा निवडणुकीत कुणबी समाजाचा उमेदवार असेल असे जाहीर केले होते. कुणबी समाजाचा उमेदवार असेल तरच परिवर्तन होऊ शकेल, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. यासाठी राजेश बेंडल यांना शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.