रत्नागिरी : प्रतिनिधी
लोहार समाजातील लोहारकाम करणाऱ्या उद्योजकांनी २०१४ साली शेती अवजारांची गुणवत्ता वाढविणे, उत्पादकता वाढवून आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेत सहभाग घेतला. या योजनेत शासनाचे ८०% (४ कोटी २८ लाख) तर सभासदांचे २०% म्हणजेच १ कोटी २५ लाख या प्रमाणे ५ कोटी ५३ लाख रुपये एवढ्या रकमेची गुंतवणूक करून देवरुख एमआयडीसी सामुहिक सुविधा केंद्र उभारले आहे. शासनाने मशिनरी पुरवल्या तर सभासदांच्या हिश्यातून जमीन व इमारती बांधण्यात आल्या, शासनाने पुरवलेल्या मशिनरी पैकी मुख्य घन मशीन ट्रायल घेवून चालू करून न दिल्याने संपूर्ण सामुहिक सुविधा केंद्र बंद राहिले आहे. सदर केंद्र मार्च २०२० मध्ये कार्यान्वित होणे आवश्यक होते. साल २०२० पासून उद्योग विभागाशी पाठपुरावा तसेच त्यानंतर उद्योगमंत्रीकडे पाठपुरावा, जनता दरबार, लोकशाही दिन, लोककप्रतिनिधी यांच्या मार्फत पाठपुरावा, आमदारांकडे हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडूनसुद्धा शासनाने दाखल घेतली नाही.
सामुहिक सुविधा केंद्राचे ५० सभासद आहेत. समूह उद्द्योगाच्या संचालक व सभासदांनी सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपये इतकी रक्कम आतापर्यंत खर्च केली असून त्यापैकी ८४ लाख रु पतपेढी, बँक व सावकारी कर्जाने घेतलेली आहे. तर ६१ लाख रुपये एवढी रक्कम सभासदांनी दागदागिने गहाण ठेवून व वैयक्तिक कर्ज काढून जमा केली आहे. सामुहिक सुविधा केंद्र चालू नसल्याने अद्याप कोणतेही आर्थिक उत्पन्न नाही. आतापर्यंत सामुहिक सुविधा केंद्राचे एक कोटी ९० लाख एवढे नुकसान झाले आहे. कर्ज रकमेवर प्रचंड व्याज द्यावे लागत असल्याने सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मुख्य मशीन चालू न केल्याने व संपूर्ण कंपनी बंद पडल्याने इतर मशिनरी सुद्धा नादुरुस्त झाल्या आहेत. वारंवार शासन दरबारी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. आम्ही उद्योग विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार यांना निवेदन दिले होते कि ९ ऑगस्टपर्यंत सामुहिक सुविधा केंद्र कार्यान्वित करून न दिल्यास सर्व संचालक ९ ऑगस्ट रोजी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार व सामुहिक सुविधा केंद्राचे अध्यक्ष कमलाकर गोपाळ मसुरकर हे आमरण उपोषण करणार, तरी सुद्धा शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधून सरकारने सामुहिक सुविधा केंद्र कार्यान्वित करून देणेकरिता श्री. कमलाकर मसुरकर हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.




