रत्नागिरी : प्रतिनिधी
घरगुती वीजग्राहकांना मासिक ३६० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये रत्नागिरी मंडलात ८४० किलोवॅट क्षमतेचे २३१ छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे या ग्राहकांचे मासिक वीजबिलदेखील शून्य झाले आहे. यात सर्वाधिक १८० प्रकल्प रत्नागिरी शहरात सुरू झाले आहेत.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाव्दारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविता येते. तसेच सदर योजनेत भाग घेतलेल्या वीज ग्राहकांना त्यांनी मागणी केलेल्या भारानुसार किमान रू. ३०,०००/- ते कमाल रू. ७८,०००/- पर्यंत अनुदान शासनाकडून मिळण्याची तरतूद आहे. तसेच सदर प्रकल्प उभरणीकरिता सवलतीच्या दराने कर्ज सुविधा बँकांमार्फत उपलब्ध करून दिली जात आहे.
या प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात येत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात कमी (समायोजित) केली जात आहे. घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता महावितरण तर्फे या योजनेची माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.