रत्नागिरी : प्रतिनिधी
गेले अनेक महिने रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात आयडॉलच्या विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण केलेल्या विषयांचे गुणपत्रक उपलब्ध झाली नाहीत. अनेकवेळा पाठपुरावा करून देखील मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राकडे आयडॉल मुंबईकडून गुणपत्रके पाठवली जात नसल्याने विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप होत होता. काही विद्यार्थ्यांनी दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्याकडे धाव घेत सदर प्रश्न मांडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे रत्नागिरी येथे आले असता डॉ.ऋषिकेश केळकर यांनी हा प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांच्याजवळ मांडला.
या विषयाची तातडीने दखल घेत आ. निरंजन डावखरे यांनी थेट मुंबई विद्यापीठ आयडॉल विभागाशी संपर्क साधत विषय त्वरित सोडवून रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके पाठविण्यात यावीत, अशी विनंती केली. याप्रसंगी दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यासोबत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. हा विषय योग्यरीत्या हाताळल्याबद्दल व सहकार्य केल्याबद्दल विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांचे आभार मानले. या विषयाबद्दल पुढे देखील मी पाठपुरावा करणार असून, विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके रत्नागिरी विद्यापीठ उपकेंद्र आयडॉल येथे मिळवून देणार आहे. तसेच इतर प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे भाजयुमो दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सांगितले.




