रत्नागिरी : प्रतिनिधी
विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका २६ नोव्हेंबर पूर्वीच पार पडतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मात्र त्यांनी या वेळी निश्चित तारीख सांगितली नाही. आज निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर उहापोह केला. भाजप, बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला करण्यात आल्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
पैशांचा गैरवापर, मसल पॉवर रोखणार
फेक न्यूजचा प्रचार आणि प्रसार थांबवावा अशीही विनंती सर्व पक्षांनी केली. लोकांना मतं देताना कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. जे मतदार फोन घेऊन येतात त्यांना तो सोडून जाताना आणि परत नेताना अडचणी येतात. त्याची व्यवस्था करावी अशीही विनंती राजकीय पक्षांनी केली आहे. पैशांचा गैरवापर, मसल पॉवर रोखण्याचीही विनंती केली. वृद्ध लोकांच्या येण्याची-जाण्याची व्यवस्था करावी, अशीही विनंती करण्यात आली. पोलिंग एजंट हा स्थानिक असावा अशीही विनंती करण्यात आली. असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरधून पैशांच्या बॅगा नेण्यात आल्या, असा आरोप विरोधकांनी केला होता. याबाबत निवडणूक आयुक्त म्हणाले की, सर्वांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्वांच्याच हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी जराही मागेपुढे पाहू नये, असेही सांगितले गेले आहे. ज्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांची बदली करण्यात यावी, असेही निर्देश दिले असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात एकूण ९.५९ कोटी मतदार
महाराष्ट्रात एकूण मतदार ९.५९ कोटी आहेत. पुरूष मतदारांची संख्या ४.५९ कोटी तर महिला मतदारांची संख्या ४.६४ कोटी आहे. रत्नागिरी न्यूज नेटवर्क. १८ ते १९ वयोगटातील प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या १९.४८ लाख आहे.
निवडणूक आयोगाने राजकीय चिन्हांबाबत आधीच निर्णय दिलेले आहेत. ज्या पक्षांचे दोन गट आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या विनंतीनुसार इतर चिन्ह दिले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांच्या चिन्हाबाबत आताच काही सांगू शकत नाही, असे राजीव कुमार म्हणाले.