रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांसाठी १,४३७ शिक्षकांची भरती करण्यात आली. मात्र, या भरतीत स्थानिक केवळ १६ उमदेवारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. टीईटी परीक्षेत स्थानिक उमेदवारांचा कस लागत नसल्यानेच भरती प्रक्रियेत स्थानिकांचा समावेश कमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र इथेही काही झोल आहे का? हे तपासण्याची गरज आहे. स्थानिक पालकमंत्री, सर्वपक्षिय आमदार, जिल्हा परिषद माजी पदाधिकारी, सदस्य यानी यावर आवाज उठविण्याची गरज आहे. स्थानिक टक्का कमी करून इथल्या शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करण्यात येत असल्याचे लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
शासकीय भरतीमध्ये स्थानिकांनाच संधी द्या, अशी मागणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकडून सातत्याने सुरू आहे. मात्र या मागणीला फाट्यावर मारण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या शिक्षक भरतीमध्ये १,४३७ उमेदवारांना घेण्यात आले. मात्र, या भरतीमध्ये स्थानिक उमेदवार केवळ १६ होते. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या टीईटी परीक्षेत स्थानिक उमेदवार उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे वर्ष २००४ पूर्वी कोकण निवड मंडळ होते. त्यावेळी नोकर भरतीमध्ये ८० टक्के स्थानिकांसाठी २० टक्के इतर जिल्ह्यांतील उमेदवार भरण्याची तरतूद होती. त्या कालावधीत हजारो स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाले होते. आता प्रक्रिया बदलल्याने स्थानिकांना संधी मिळत नाही.
लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतेच काय?
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक भरती पार पडली असताना स्थानिक शिक्षक न घेता जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची भरती करण्यात आली. या भरतीत जिल्ह्यातील फक्त १६ उमेदवार नियुक्त झाले. उर्वरित १४२१ पदे जिल्हा बाहेरील भरण्यात आली. या विषयावर कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवलेला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतेच आहेत काय? असा सवाल उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींना आपल्या निवडणुकीचे पडलेले आहे मात्र जनतेच्या रोजगाराचे पडलेले नाही. सुशिक्षित बेरोजगारांना झेंडे उचलविण्यास लावणारे लोकप्रतिनिधी शिक्षक भरती स्थानिकांना प्राधान्य मिळवण्यासाठी आवाज का उठवत नाहीत? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
अनेक शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची भाषाही विद्यार्थ्यांना समजत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आणि पर्यायाने शाळेच्या गुणवत्तेवर होणार आहे. पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढण्यामागे हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारांची भरती होत नाही. शैक्षणिक गुणवत्तेत इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा अग्रेसर असूनहीं टीईटी परीक्षेत उमेदवार का टिकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाकडून नोकर भरतीसाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीकडून भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येते. मात्र, राज्यस्तरावर ‘मेरिट लिस्ट’ जाहीर करण्यात येत नाही. त्यामुळे उमेदवार कुठे कमी पडले याची माहिती मिळत नाही. त्यामुळे इथेच झोल असल्याचे बोलले जात आहे.